Join us
Daily Top 2Weekly Top 5

लस घेतल्यानंतर महिनाभर काळजी घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:06 IST

तज्ज्ञांचे मत; लसीकरणामुळे शरीरात विषाणूशी लढण्यासाठी तयार हाेतात अण्टीबॉडीजलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकदा लस घेतल्यानंतर महिन्याभराने दुसरी ...

तज्ज्ञांचे मत; लसीकरणामुळे शरीरात विषाणूशी लढण्यासाठी तयार हाेतात अण्टीबॉडीज

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एकदा लस घेतल्यानंतर महिन्याभराने दुसरी लस दिली जाते. दोन्ही लसींचे डोस घेतल्यानंतर शरिरात विषाणूशी लढण्यासाठी अण्टीबॉडीज तयार होतात. म्हणून या महिन्याभराच्या कालावधीत स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मुळात लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही, हे सांगणे अवघड असल्याचे मत आरोग्य क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी मांडले.

मेडिसिन स्पेशलिस्ट डॉ. मनीषा भट्ट यांनी सांगितले की, कोविड-१९ लसीकरण मोहिमेची मुंबईसह राज्यभरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नक्कीच मदत होईल. साधारणतः ७० ते ८० टक्के लोकांमध्ये लस घेतल्यानंतर चांगला परिणाम दिसून आला आहे. परंतु, कोरोना लस घेतल्यानंतर नागरिकांनी निष्काळजीपणे वागू नये. लस दोन टप्प्यात दिली जात आहे. एकदा लस घेतल्यानंतर महिन्याभराने दुसरी दिली जाते. दोन्ही लसींचे डोस घेतल्यानंतर शरिरात विषाणूशी लढण्यासाठी अण्टीबॉडीज तयार होतात. परंतु, लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होईल का, हे सांगणे अवघड आहे. सध्या लसीकरण सुरू असल्याने सहा महिन्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होईल. परंतु, कोविड-१९ लस ही अतिशय सुरक्षित असून, लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.

* काेराेनाचे रुग्ण वाढण्यास निष्काळजीपणा कारणीभूत

छातीरोग तज्ज्ञ डॉ. हरिष चाफले म्हणाले की, कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी रोखण्याकरिता लसीकरणामुळे खूप फायदा होणार आहे. लग्न समारंभ, पार्टीज्, वाहतूक यंत्रणा सुरू करण्यात आल्याने रस्त्यावर गर्दी वाढत आहे. या वाढत्या गर्दीतही लोक तोंडाला मास्क न लावताच फिरताना दिसतात. लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. सर्वप्रथम हे थांबवणे आवश्यक आहे. किंबहुना कोरोना राेखण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. लसीकरणानंतरही आजाराचा संसर्ग होऊ नये, म्हणून काळजी घ्यायलाच हवी.

...........................................