Join us
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयातील कार्डिएक केअर युनिट होणार अद्ययावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 05:00 IST

आरोग्य विभागाचा निर्णय

मुंबई : राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कृती आराखड्यामध्ये राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्राप्त अनुदानातून कार्डिएक केअर युनिटचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने नुकताच याविषयी अध्यादेश काढला असून याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

राज्यातील आठ कार्डिएक केअर युनिटच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी २४२ कोटी ७४ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडे दिलेल्या या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. यात संपूर्ण राज्यातील रत्नागिरी, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, वर्धा, अमरावती, नांदेड आणि पुण्यातील कार्डिएक केअर युनिट्सचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. यात ईसीजी मशीन, स्ट्रेस ईसीजी टेस्ट इक्विपमेंट, कार्डिएक मॉनिटर, व्हेंटिलेटर, पल्स आॅक्सिमीटर, इन्फ्युजन पाइप्स यांचा समावेश आहे.

यात रत्नागिरीसाठी २४ लाख, नंदुरबारसाठी ४० लाख, भंडारासाठी २३ लाख, गडचिरोलीकरिता ३९ लाख, वर्ध्यासाठी १८ लाख, अमरावतीसाठी ३० लाख आणि नांदेडसाठी २९ लाख, पुणेसाठी ३६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. कार्डिएक केअर युनिट्सची उपकरणे व मागणी यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. ही उपकरणे विनावापर पडून राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने दिले आहेत.