ठाणे : मंगळसूत्र तसेच सोनसाखळी चोरणाऱ्या दोन वेगवेगळ्या टोळ्यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक आणि खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले आहे. त्यामुळे ६१ गुन्हे उघडकीस आले असून एक हजार ५१७ ग्रॅम वजनाचे ३७ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ठाणे शहर व परिसरात महिलांवर पाळत ठेवून मोटारसायकलवरून दागिने हिसकावून पसार होणाऱ्या टोळीची माहिती युनिट एकला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे, राम ढिकले, राजेंद्र शिरतोडे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कुराडे, उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांच्या पथकाने ३० जानेवारी २०१५ रोजी मुंब्य्रातून इक्बाल खान, शाहीदअली अस्राअशेरी, अब्बास जाफरी आणि जाफर ऊर्फ जावेद इराणी या चौघांना सापळा लावून पकडले. चौकशीत त्यांनी ठाणे, कल्याण, उल्हासनगर भागांत २९ चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १८ लाख ५५ हजारांचे सुमारे ७४२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली.दरम्यान, खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. टी. कदम, निरीक्षक संजय कांबळे, नासीर कुलकर्णी, उपनिरीक्षक फारूख शेख आणि मनोज प्रजापती आदींच्या पथकाने कल्याणच्या आंबिवली भागातून आजम इराणी, मोहंमद ऊर्फ मामू सांगा जाकीर सय्यद आणि जाफर ऊर्फ संजय ऊर्फ टिनू आनंद मालीक सय्यद या चौघांना अटक केली. त्यांनी ठाण्यातील नौपाडा, वर्तकनगर, कळवा, कापूरबावडी, वागळे इस्टेट आणि राबोडी भागात चोऱ्या केल्याची कबुली दिल्याचे उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितले. त्यांच्याकडून ३२ गुन्हे उघड झाले असून १९ लाख ३७ हजार ५०० चे दागिने हस्तगत केले आहेत.एकूण ६१ गुन्हे उघड करून सुमारे दीड किलोचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच चेन असे ३७ लाख ९२ हजार ५०० चे दागिने हस्तगत केले आहेत. त्यांना ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)