Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्त्यावरच फेरीवाल्यांचा कब्जा

By admin | Updated: December 29, 2014 02:43 IST

मानखुर्दमधील पीएमजी कॉलनीच्या वाहतुकीसाठी असलेल्या मुख्य रस्त्यावरच फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे.

मुंबई : मानखुर्दमधील पीएमजी कॉलनीच्या वाहतुकीसाठी असलेल्या मुख्य रस्त्यावरच फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे या परिसरात आग अथवा एखादी आपत्ती ओढावल्यास अग्निशमन दल अथवा रुग्णवाहिकाही मदतीसाठी पोहोचू शकत नाही. त्यामुळे कारवाई करून हा मार्ग फेरीवालामुक्त करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरून मानखुर्दच्या साठेनगर आणि लल्लूभाई कम्पाउंड या ठिकाणी जाण्यासाठी सहा-सात वर्षांपूर्वी पालिकेने सिमेंटचा रस्ता तयार केला. मात्र दीड ते दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी काही भाजी विके्रत्यांनी रस्त्यालगतच भाजीचे स्टॉल उभे केले. त्यानंतर मासळी, कपडे विक्रेते, भांडी विक्रेते व खाद्यपदार्थांचे स्टॉलही या ठिकाणी उभे राहिले. दोन वर्षांपूर्वी अवघे चार ते पाच फेरीवाले या रस्त्यावर होते. मात्र सध्या या ठिकाणी दोनशे ते तीनशे फेरीवाल्यांनी रस्त्यालगत कब्जा केला आहे. विशेष म्हणजे याच परिसरातील काही राजकीय नेते आणि काही बोगस पत्रकारांनीदेखील रस्त्यालगत जागा अडवून ती भाड्याने दिली आहे. सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत या ठिकाणी हे फेरीवाले धंदा लावून बसतात. दिवसेंदिवस या फेरीवाल्यांची ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही जण तर मिळेल त्या ठिकाणी स्टॉल उभे करीत असल्याने हा संपूर्ण रस्ताच या फेरीवाल्यांनी काबीज केला आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी या मार्गावरून एकाही वाहनाला जाता येत नाही. तसेच या परिसरात एखादी आपत्ती ओढावल्यास अग्निशमन दलाची गाडी किंवा रुग्णवाहिकाही फेरीवाल्यांमुळे लोकांच्या मदतीला पोहोचू शकत नाही. त्यातच स्कूलबस आणि रिक्षाचालकदेखील या मार्गावरून जाण्यास नकार देत असल्याने रहिवाशांना मुख्य रस्त्यावर जाऊन रिक्षा पकडावी लागते. त्यामुळे पालिकेने तत्काळ या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)