Join us  

पेपर द्यायच्या आधीच झाला सोशल मीडियावर व्हायरल, साकीनाका केंद्रावरही आरोग्य सेवा परीक्षेचा बोजवारा उडाल्याची उमेदवारांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 9:45 AM

papers leak : मुंबईतील परेरावाडी, साकीनाका, अंधेरी येथील शिवेनरी विद्या मंदिरात आरोग्य विभागाचा पेपर आयोजित करण्यात आला होता. पण पेपर फुटल्यानेआरोग्य सेवा गट क संवर्गाची परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी उमेदवार करत आहेत.

मुंबई : राज्यभरात आरोग्य सेवेच्या गट क परीक्षांचा बोजवारा उडालेला असताना मुंबईतील केंद्रावरही परीक्षेच्या आधीच पेपर फुटल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या आहेत. मुंबईतील साकीनाका येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली असून, शेकडो विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेरच ठिय्या आंदोलन केले.

मुंबईतील परेरावाडी, साकीनाका, अंधेरी येथील शिवेनरी विद्या मंदिरात आरोग्य विभागाचा पेपर आयोजित करण्यात आला होता. पण पेपर फुटल्यानेआरोग्य सेवा गट क संवर्गाची परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी उमेदवार करत आहेत. दुपारच्या सत्रातील आयोजित या पेपरची वेळ ३ ते ५ अशी होती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी अडीज वाजताच व्हॉट्सॲपवर पेपर व्हायरल झाल्याचा दावा केला आहे. परीक्षा केंद्रावर प्रचंड तणाव आणि गोंधळ निर्माण झाला असून, पोलीस आणि परीक्षार्थी आमने-सामने भिडले होते. अनेक उमेदवारांना तर बळजबरीने पेपर लिहिण्यास बसविले असून ३ चा पेपर ४. ३० वाजता देण्यास त्यांना भाग पाडल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.

यापूर्वीच हॉलतिकीट आणि सेंटर बदलल्याने विद्यार्थी हैराण होते, त्यात केंद्रात विद्यार्थ्यांसमोर सील फुटलेल्या प्रश्नपत्रिका आल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला. एकाच बाकावर दोन विद्यार्थ्यांना बसविण्याचे नियोजन केल्याने कोरोनाच्या नियमांचे पालन केल्याचे कुठेही दिसत नव्हते. मात्र, विद्यार्थ्यांना चक्क मोबाइल परीक्षा केंद्रावर नेण्यास परवानगी देण्यात आल्याने हा पेपर आणखी व्हायरल झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

अर्ध्याहून अनेक विद्यार्थी सोलापूर, बीड, सांगली, सातारा, मराठवाडा येथून परीक्षेसाठी आले होते. मात्र, परीक्षा केंद्रावरील गोंधळामुळे, परीक्षेच्या आधीच पेपर व्हायरल झाल्याने ते परीक्षा न देताच त्यांच्या गावी परत जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या परीक्षा घेण्याचे कंत्राट ज्या कंपन्यांना देण्यात आलेले आहे त्या कंपन्या ब्लॅक लिस्टेड असून, राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच खासगीऐवजी एमपीएससीकडून परीक्षांचे आयोजन करावे, अशी मागणी विद्यार्थी संघटना करीत आहेत.

पोलिसांचा तपास सुरूमुंबईतील साकीनाक्याच्या शाळेतील केंद्रावर आरोग्य विभागाची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा पेपर अडीच वाजताच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा विद्यार्थी दावा करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपासणी सुरू असून, पोलिसांचा अहवाल सादर झाल्यानंतर आम्ही काय कार्यवाही करायची याचा निर्णय घेऊ.- डॉ अर्चना पाटील, संचालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग

टॅग्स :मुंबईराजेश टोपे