Join us

कर्करोग नियंत्रण हे मोठे आव्हान

By admin | Updated: January 30, 2017 02:27 IST

कर्करोग नियंत्रण हे आपल्या सर्वांसमोरील मोठे आव्हान आहे. कर्करोगावरील उपचार हे सरकारी संस्थांमध्ये मोफत अथवा त्यांच्यावर अनुदान दिले जाते

मुंबई : कर्करोग नियंत्रण हे आपल्या सर्वांसमोरील मोठे आव्हान आहे. कर्करोगावरील उपचार हे सरकारी संस्थांमध्ये मोफत अथवा त्यांच्यावर अनुदान दिले जाते. गरीब रुग्णांना राष्ट्रीय आरोग्य निधी अंतर्गत विविध योजनांद्वारे आर्थिक सहाय्य पुरवले जाते. जनतेचे कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी आणि उपचार देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. निरोगी भारत निर्मितीसाठी, तसेच कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केले.टाटा मेमोरियल केंद्राच्या अमृतमहोत्सवी परिषदेत शनिवारी ते बोलत होते. आरोग्यदायी व्यक्ती, समाज आणि देशाच्या दिशेने सुरू होणाऱ्या नवीन प्रवासाची ही सुरुवात आहे, अशी आशा नड्डा यांनी व्यक्त केली. गुणवत्ता पूर्ण आरोग्य सोयींच्या उपलब्धतेत वाढ करण्यासाठी, तसेच या सोयींचा आवाका वाढवण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अनेक योजना आणि राष्ट्रीय उपक्रम हाती घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.देशात टर्शरी केअर कॅन्सर फॅसिलिटीमध्ये वाढ करण्यासाठीच्या योजनेला सरकारने मान्यता दिली आहे. मलेरिया, क्षयरोग आणि एचआयव्ही एड्सच्या घटना कमी करण्यासाठीचे एमडीजी ६ हे लक्ष्य भारताने साध्य केले आहे. पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्युदरात आणि माता मृत्युदरात जागतिक सरासरीच्या तुलनेत भारतात मोठ्या प्रमाणावर कपात झाली आहे.आपल्या देशासमोर संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांचे दुहेरी ओझे आहे. राज्य सरकारांच्या प्रयत्नांना सहाय्य म्हणून कर्करोग, मधुमेह, हृदयविकार या रोगांवर नियंत्रण आणि त्यांचा अटकाव यासाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मार्च २०१४ मध्ये भारताने पोलिओ मुक्त राष्ट्र हा दर्जा साध्य करण्याबरोबरच, मे २०१५ मध्ये माता आणि नवजात शिशुंमधील धनुवार्ताचे यशस्वीरीत्या उच्चाटन केले आहे. इंद्रधनुष उपक्रमाच्या अंमलबजावणीत ७ टक्क्यांपर्यंत वार्षिक वाढ झाली आहे. सर्व व्यक्तींना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा उद्देश असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)