Join us

लाखांवरील सोने खरेदीसाठी पॅनची अनिवार्यता रद्द?

By admin | Updated: April 2, 2015 22:50 IST

एक लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे सोने खरेदी करण्यासाठी पॅनकार्ड सक्तीचे करण्याची अट रद्द केली जावी, अशी मागणी महाराष्ट्र सराफ आणि सुवर्णकार

ठाणे : एक लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे सोने खरेदी करण्यासाठी पॅनकार्ड सक्तीचे करण्याची अट रद्द केली जावी, अशी मागणी महाराष्ट्र सराफ आणि सुवर्णकार महामंडळाने केली आहे. अर्थसंकल्प पूर्व चर्चेच्यावेळी हा मुद्दा उपस्थित केला असता सरकारने याबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते पाळले गेले नाही. असे सराफांचे म्हणणे आहे.भारतात ७० टक्के जनतेकडे अजूनही पॅनकार्ड नाही आणि सोन्याचे भाव २८ हजार रुपये तोळ्याच्या आसपास असतात. त्यामुळे १ लाखात फार तर साडेतीन तोळे सोने येते यामध्ये एखादाच दागिना होतो. त्यामुळे यापेक्षा जास्त रकमेचे सोने खरेदी करणे ही जनतेची विवाह वा अन्य प्रसंगी गरज ठरते परंतु पॅन नसल्यामुळे मग असे ग्राहक अधिकृतपणे सोने खरेदी करू शकत नसल्याने ते काळ्याबाजारातून सोने खरेदी करण्याकडे वळतात. या सोन्याचे बिल मिळत नसल्याने त्याची शुद्धता आणि दर्जा याचीही गॅरंटी नसते. यात नुकसान सरकारचे आणि ग्राहकांचे होणार आहे. दोन नबंरचे व्यवहार झाल्याने सरकारचे कर रुपाचे उत्पादन बुडेल तर ग्राहकांना शुद्ध सोने मिळणार नाही. त्याचबरोबर अधिकृतपणे व्यवहार करणाऱ्या सराफांचा धंदा कमी होईल म्हणजे त्यांनाही फटका बसेलच हे लक्षात घेऊन पॅनकार्डाची सक्ती रद्द करावी किंवा त्याच्या अनिवार्यतेची मर्यादा वाढवावी, असे सराफांचे म्हणणे आहे.