Join us  

भूमिगत पार्किंग प्रस्ताव रद्द का करीत नाही? वांद्र्यातील स्थानिकांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:26 AM

वांद्रे येथील पटवर्धन पार्कातील पार्किंगसाठी पालिकेकडून काढण्यात आलेल्या निविदेला सलग अकरावी  मुदतवाढ दिली आहे.

मुंबई : वांद्रे येथील पटवर्धन पार्कातील पार्किंगसाठी पालिकेकडून काढण्यात आलेल्या निविदेला सलग अकरावी  मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ ११ जानेवारी २०२४ पर्यंत आहे. इतक्या वेळा निविदेची प्रक्रिया पुढे ढकलण्यापेक्षा महापालिका प्रस्ताव रद्द का करीत नाही, असा प्रश्न स्थानिकांनी विरोध करताना उपस्थित केला आहे.

पालिका पटवर्धन पार्कात बांधत असलेल्या भूमिगत पार्किंगच्या विरोधात स्थानिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्याच्यावरही सुनावणी ही ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे. एकीकडे जिथे या कारणास्तव पालिकेला निविदा सादर करण्याची प्रक्रिया सातत्याने पुढे ढकलावी लागत आहे.  दुसरीकडे पटवर्धन पार्क ही जागा खेळण्यासाठी राखीव ठेवून भूमिगत वाहनतळ रद्द करण्यासाठी स्थानिक ठाम आहेत.

वांद्रे पश्चिम येथील एसव्ही रोडजवळ पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे नॅशनल महाविद्यालयासमोरील पटवर्धन उद्यानाखाली भूमिगत वाहनतळ उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

का होतोय विरोध?

 एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळात हे पटवर्धन पार्क विस्तारले असून त्याला पर्यावरण आणि वनविभाग, तसेच हवामान बदल विभागाने जंगल म्हणून घोषित केलेले आहे. त्यामुळे अशा संरक्षित वनक्षेत्रात वाहनतळ उभारलेच जाऊ शकत नाही, असा दावा जनहित  याचिकेतून केलेला आहे.

 पालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांना इथे भूमिगत वाहनतळ अथवा इतर कोणत्याही प्रकल्पासाठी नैसर्गिक मातीचे उत्खनन करण्यास कायमस्वरूपी प्रतिबंधित करावे, तसेच इथे भूमिगत वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेताना इतर पर्यायी जागांचा किंवा पर्यावरणाच्या संभाव्य नुकसानीचा कोणताही विचार केलेला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकापार्किंग