Join us  

क्लस्टरमधून गावठाण कोळीवाड्यांची सुनावणी रद्द करा, ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 12:06 PM

क्लस्टर योजनेतून वगळण्यात यावे या मागणीसाठी मागील दिड ते दोन वर्षापासून गावठाण, कोळीवाड, पाडे यांचा सुरु असलेला लढा आजही सुरुच असल्याचे दिसत आहे. आजही येथील रहिवाशांना सुनावणीसाठी बोलावले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी जे तोंडी आश्वासन दिले होते, ते आश्वासनाची पुर्तता करीत गावठाण, कोळीवाडे, पाडे यांना क्लस्टर योजनेतून तत्काळ वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ठाणे : ठाण्यात राबविण्यात येत असलेल्या क्लस्टर योजना अद्यापही सुरु झालेली नाही. परंतु या योजनेतून गावठाण कोळीवाडे वगळले आहेत किंवा नाही, याबाबत अद्यापही आध्यादेश काढण्यात आलेला नाही. परंतु या योजनेच्या विशेष नियमावली अंतर्गत नागरी पुननिर्माण आराखडा ( युआरपी) बाबत सूचना/ हरकतीवर होणारी कोळीवाडा,गावठाण, पाडे येथील भूमीपुत्रांची व सर्व ठाणेकरांची सुनावणी रद्द करण्यात यावी तसेच गावठाण, कोळीवाडे ,पाडे जर क्लस्टर योजनेतून वगळण्यात आले आहेत तर तेथे वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्र व स्थानिक राहिवाश्यांच्या सुनावण्या रद्द करून गावठाण, कोळीवाडे, पाडे क्लस्टर योजनेतून वगळल्याचा लेखी शासन निर्णय आदेश तत्काळ काढण्यात यावा अशी मागणी ठाणे शहर गावठाण             कोळीवाडे पाडे संवर्धन समितीच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लेखी स्वरुपात करण्यात आली आहे.                         क्लस्टर योजना सुरु झाल्यानंतर त्यातून गावठाण, कोळीवाडे, पाडे यातून वगळण्यात यावे यासाठी येथील भुमिपुत्रांनी मागील दिड वर्षापासून लढा उभारला आहे. तसेच या लढ्याची दखल घेत स्थानिक आमदारांनी देखील याविषयाची वाचा फोडून गावठाण, कोळीवाड्यातील रहिवाशांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची हमी दिली होती. तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावठाण,कोळीवाडे ,पाडे क्लस्टर योजनेतून वगळण्यात येतील असे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु पण आज पर्यंत त्यांनी दिलेल्या या तोंडी आश्वासनाचे लेखी शासन निर्णय आदेशातमध्ये रूपांतर झाले नसल्याची खंत येथील रहिवाशांनी या निवेदनाद्वारे मांडली आहे. तसेच विधान सभा व विधान परिषद सभागृहात जो पर्यंत गावठाण कोळीवाडे यांचे विस्तारित सिंमांकान होत नाही तोपर्यंत क्लस्टर योजना तशाच विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कोणत्याही योजना राबवता येऊ नये व येणार देखील नाही त्याबाबत सखोल चर्चा होऊन आश्वासन पण देण्यात आले आहे. परंतु तरीदेखील क्लस्टर योजना जोर जबरदस्तीने रेटण्याचा अट्टहास का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळेच आज देखील क्लस्टर योजनेची टांगती तलवार आम्हा सर्व कोळीवाडा गावठाण पाडे येथील भूमिपुत्रांच्या डोक्यावर असल्याचेही त्यांनी या निवेदनात नमुद केले आहे. त्यामुळेच आज देखील सुनावणींना हजर राहण्याचे पत्र कोळीवाडा, गावठाण,पाडे मधील भूमिपुत्रांना ठाणे महापालिका पाठवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून आता आपण गावठाण, कोळीवाडे, पाडे क्लस्टर योजनेतून वगळले असा लेखी शासन निर्णय आदेश लवकरात लवकर काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे.शिवाय ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव प्र. क्र . ५८६ मध्ये गावठाण कोळीवाडे वगळण्याचे प्रस्तावित करण्यात येत आले आहे. स्असे असतांनाही ठाणे महापालिकेतील संबधित अधिकारी गावठाण, कोळीवाडा येथील स्थानिक भूमिपुत्रांना क्लस्टर योजनेबाबत सुनावणीसाठी का बोलविण्यात येत आहे त्याचा जाब विचारण्यात यावा व त्या अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई व त्याची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. यापूर्वी ही गावठाण कोळीवाडा येथील भूमीपुत्रांनी सहसंचालक, नगर रचना,कोकण विभाग,कोकण भवन,सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई येथे आपल्या हरकती सूचना लेखी दिल्या व त्या संबंधीच्या सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहून आपले स्पष्ट मत सहसंचालकांच्या समोर मांडले तरी पुन्हा पुन्हा सुनावण्यांना भूमिपुत्रांना का सामोरे जावे लागते आहे? त्यामुळे तत्काळ आदेश काढून भूमिपुत्रांना या क्लस्टर योजनेतून कायमचे वगळून त्यांचा शाश्वत स्वयं विकासासाठीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी देखील त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाउद्धव ठाकरे