Join us  

एकाच प्रकरणात दोन एफआयआर होऊ शकतात का? काय म्हणतात कायदेतज्ज्ञ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 7:37 AM

मालवणीत शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन वर्षांत एकाच व्यक्तीवर एकाच गुन्ह्यात दोनदा दखलपात्र (एफआयआर) नोंद केली. यात एक आरोपी मयत आहे.

- गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : मालवणीत शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन वर्षांत एकाच व्यक्तीवर एकाच गुन्ह्यात दोनदा दखलपात्र (एफआयआर) नोंद केली. यात एक आरोपी मयत आहे. बोरिवली तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या सगळ्यात हलगर्जीपणा झाला का?  एकाच प्रकरणात दोन एफआयआर दाखल करता येतात का? याचा फायदा आरोपीला मिळू शकतो का? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले असून ‘लोकमत’ने याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यावर त्यांनी मांडलेली मते. चौकशी नंतर, आधी गुन्हा दाखल करासर्वोच्च न्यायालयाने जवळपास पाच वर्षांपूर्वी ललिता कुमारी प्रकरणात निकाल दिला. त्यानुसार पोलिसांकडे दखलपात्र स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती आली तर त्यांनी आधी एफआयआर दाखल केला पाहिजे. त्यासाठी त्यांना चौकशी करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. एफआयआर दाखल झाल्यानंतर ते पुढील कार्यवाही करू शकतात. जरी त्या प्रकरणात एफआयआर झाला असेल तरी त्यात तथ्य आढळले नाही तर मॅजिस्ट्रेटसमोर त्या प्रकरणात तथ्य आढळले नाही याची माहिती देऊन आणि तक्रारदाराला बोलावून त्यावर आर्ग्युमेंट करत बंद करता येते. कलम २०(२) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा खटला चालवता येत नाही तसेच शिक्षाही केली जात नाही. कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी दोनदा खटला चालवला जाऊ शकत नाही. टी. टी. अँथनी विरुद्ध केरळ राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, समान दखलपात्र गुन्हा, समान घटनेच्या संदर्भात दुसरी एफआयआर असू शकत नाही.  - एकनाथ सावंत, कायदेतज्ज्ञ, लॉ प्रोफेसर आरोपीला मिळू शकतो फायदा मालवणी दुहेरी एफआयआर प्रकरणात पोलिसांना तहसीलदार कार्यालयाकडून आलेल्या अर्जानंतर त्यांनी तक्रार दाखल केली आहे. कारण या गुन्ह्याचे स्वरुप हे  दखलपात्र आहे. मात्र, यामध्ये तहसीलदार कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा उघड होत आहे. कारण जर संबंधित अधिकारी घटनास्थळी गेले होते तर एफआयआरमध्ये ज्या तीन आरोपींची नावे नमूद केली आहेत, त्यातील एकाचा गेल्यावर्षी मृत्यू झाला आहे, ही बाब त्यांना कशी नाही समजली, असा प्रश्न उपस्थित होतो. यावरून हा तक्रार अर्ज निव्वळ ऐकीव माहितीच्या आधारे देण्यात आल्याचे उघड होत आहे. त्यामुळे याचा फायदा आरोपीला मिळू शकतो. कारण यापूर्वीचा एफआयआरदेखील अशाचप्रकारे करण्यात आल्याचा दावा आरोपी न्यायालयात करू शकतो. - जयवंत हरगुडे, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त, मालवणी विभाग‘तो’ एफआयआर रद्द करता येतोकायद्यातील तरतुदी आणि यापूर्वी करण्यात आलेल्या अनेक न्यायनिवाड्यांमधून नमूद केल्याप्रमाणे, त्याच गुन्ह्यासाठी दुसरा एफआयआर बेकायदेशीर आहे. कायद्यानुसार समान गुन्ह्यावरील दुसऱ्यांदा दाखल केलेला एफआयआरनंतर तो रद्द केला जाऊ शकतो. असे असले तरी जर विषय वेगळा असेल किंवा एफआयआरमध्ये वेगळी तक्रार असेल तर तो रद्द न करता, त्या अनुषंगाने पुढील तपास करता येतो.  - ॲड. विशाल सत्यप्रकाश सक्सेना, सर्वोच्च न्यायालय