Join us

प्रचारामध्ये ‘अच्छे दिन’चा जाब विचारणार

By admin | Updated: June 3, 2015 23:14 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ‘अच्छे दिन किधर है, कहाँ है’ या मतदारांच्या प्रश्नांचा सामना युतीला करावा लागणार आहे.

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ‘अच्छे दिन किधर है, कहाँ है’ या मतदारांच्या प्रश्नांचा सामना युतीला करावा लागणार आहे. वाढलेली महागाई, गॅस सिलेंडर पेट्रोल-डिझेलचे दर, सेवाकरांमधील वृद्धी, टोलचा प्रलंबित प्रश्न यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे मतदार युतीच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान जाब विचारतील अशी शक्यता आहे.‘अच्छे दिन आऐंगे’ अशा वल्गना करून केंद्र व राज्यात सत्तेत येणाऱ्या भाजपा सरकारने फसवणूक केल्याची भावना आता सर्वसामान्यांमध्ये आहे. त्याचे पडसाद महानगरपालिकेच्या या निवडणुकीत दिसून येतील, असा अंदाज आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा, जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्यासोबत सेनेचीही चांगलीच फरफट झाली. जिल्हापरिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने सेनेला धोबीपछाड देत बहुजन विकास आघाडी समवेत घरोबा केला. त्यामुळे युतीमध्ये बिघाडी निर्माण झाली होती. जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेत पुन्हा युतीच्या माध्यमातून सत्ता काबीज करण्यात सेना-भाजप यशस्वी झाले असले तरी, महानगरपालिका निवडणुकीमध्ये युतीला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसाधारण मतदार भाजप सरकारवर नाराज आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये घटकपक्ष म्हणून तसेच राज्यात सत्तेमध्ये असल्यामुळे सेनेलाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. वसई विरार उपप्रदेशासाठी कार्यान्वित करण्यात येणाऱ्या सुसरी धरणातील पाणी देण्यास भाजपच्या खासदाराने विरोध केल्याने ही योजना बासनात गुंडाळल्या गेली. या योजनेकरिता महानगरपालिकेने शासनाकडे ठराविक रक्कमेचा भरणाही केला, परंतु राजकीय विरोधामुळे हा प्रश्न अद्याप सुटू शकलेला नाही.प्रचारादरम्यान युतीच्या उमेदवारांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला तर, बहुजन विकास आघाडीतर्फे पाण्याला विरोध कोण करते, यावर प्रचाराचा भर राहणार असल्याचा अंदाज आहे. मागील चार वर्षांपासून सुसरी धरणाचे काम इंचभरही पुढे सरकले नाही. त्यामुळे या योजनेचा भांडवली खर्चही आता वाढणार आहे. तो शेवटी मतदारांच्यांच खिशातून केला जाणार आहे. त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर युतीच्या उमेदवारांना द्यावे लागेल.(प्रतिनिधी)