Join us
Daily Top 2Weekly Top 5

लसीअभावी मुंबईतील मोहीम पुन्हा थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:06 IST

पालिका, सरकारी केंद्रांवर आज लसीकरण बंदलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे मुंबईत मंगळवारी पालिका आणि सरकारी ...

पालिका, सरकारी केंद्रांवर आज लसीकरण बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे मुंबईत मंगळवारी पालिका आणि सरकारी ५८ निवडक केंद्रांवर लसीकरण पार पडले. दिवसभरात ४२ हजार नागरिकांनी लस घेतली. यापैकी खासगी रुग्णालयात लस घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र लसींचा साठा संपुष्टात आल्याने बुधवारी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येणार आहे. केवळ खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्धतेनुसार लस दिली जाणार आहे.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ६५ लाख ६७ हजार ३२४ नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी ५० लाख ५४ हजार १९८ लोकांनी कोविड प्रतिबंध लसीचा पहिला डोस आणि १५ लाख १३ हजार १२६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. दररोज एक लाख लोकांना लस देण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे.

पालिका, सरकारी आणि खासगी केंद्रांमध्ये मंगळवारी ४२ हजार ४८३ नागरिकांनी लस घेतली. यापैकी २५ हजार ८५५ नागरिकांनी पहिला डोस तर, १६ हजार ६२८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. मात्र केंद्राकडून लसीचा नवीन साठा आलेला नाही. पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्र बुधवारी बंद राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.