Join us
Daily Top 2Weekly Top 5

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:06 IST

मुंबई : जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार ...

मुंबई : जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले.

वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत जलजीवन मिशन नियोजन व अंमलबजावणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याचे नळजोडण्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

कामांना गती देण्यासाठी पाणीपुरवठा विभागातील रिक्त पदे भरावीत. तोपर्यंत आवश्यक अभियंत्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात बाह्ययंत्रणे मार्फत घ्याव्यात. तसेच इतर विभागांतील पदांचा आढावा घेऊन आणखी आवश्यक अभियंते त्या विभागाकडून उपलब्ध करून घ्यावेत, अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. कामांचा सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमित आढावा घ्यावा. मुख्य सचिव यांनीही याबाबत आढावा घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळजोडणीच्या माध्यमातून पाणी पोहोचविण्यासाठी या वर्षासाठी ७ हजार ६४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून तेवढाच निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. २०२४ पर्यंत ३८ हजार ६५३ योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी २४ हजार ९४९ कोटी रुपये खर्च येणार आहे. निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्याची गतीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाच कोटी रुपयांवरील २०० योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार आहेत आणि डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

नळजोडण्यांचे ६५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

जल जीवन मिशनअंतर्गत सन २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ९३ लाख ६ हजार नळजोडण्यांचे काम म्हणजेच ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ४९ लाख २९ हजार नळजोडण्यांचे काम बाकी आहे. राज्यात आतापर्यंत शाळांमध्ये ८६ टक्के, तर अंगणवाड्यांमध्ये ७७ टक्के नळजोडण्या देण्याचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.