Join us  

पोलीस ठाण्यात आला, फिनेलची बाटली प्यायला; वाकोला पोलिसात गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Published: October 18, 2023 8:23 PM

खुमनसिंह गेलोट (४७) असे इसमाचे नाव

गौरी टेंबकर-कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वाकोला पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षात खुमनसिंह गेलोट (४७) नावाच्या इसमाने सोबत आणलेली फिनेलची बॉटल प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी घडला असून याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकोला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेलोटला १६ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ अधिकाऱ्याना भेटायचे होते त्यामुळे तो पोलीस ठाण्यात आला. मात्र त्यावेळी वरिष्ठांच्या दालनात महत्त्वाची बैठक सुरू होती. त्यामुळे ती संपताच भेट घडवून आणून देण्याचे पोलीस कर्मचाऱ्यानी गेलोटला सांगितल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र त्याने काहीच न ऐकता आरडाओरड सुरू केली आणि बाहेर निघून गेला. त्यानंतर पुन्हा दुपारी १ वाजता तो परतला आणि त्यानंतर फिनाइल पिऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने त्याला वैद्यकीय उपचारासाठी व्ही एन देसाई रुग्णालयात हलवले. तिथे त्याला डॉक्टरने अंतररुग्ण म्हणून दाखल करून घेत उपचार सुरू केले. त्यानुसार त्याची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गेलोटविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.त्याने यापूर्वी देखील असा प्रयत्न केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :गुन्हेगारीपोलीस ठाणे