Join us

मित्र म्हणून आला अन् दागिने चोरून गेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 23:51 IST

एका इंटरनॅशनल कंपनीतील एचआर मॅनेजरचे १ लाख ८९ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार सायनमध्ये उघडकीस आला आहे.

मुंबई : मित्र असल्याचे सांगून ओळख केली. वाटेतच चोरी होत असल्याची भीती घालून दागिने काढून ठेवण्याच्या नावाखाली एका इंटरनॅशनल कंपनीतील एचआर मॅनेजरचे १ लाख ८९ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार सायनमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चेंबूरचे रहिवासी असलेले दिनेश हेमदेव (४४) यांची यात फसवणूक झाली आहे. ते अंधेरीतील एका इंटरनॅशनल खासगी कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत घरीच कंपनीचे काम उरकून कुटुंबासह शिर्डीला जायचे असल्याने सायन सर्कल परिसरात बसची चौकशी केली. पुढे सांताक्रुझला जाण्यासाठी सायन-वांद्रे लिंक रोडवरील राणी लक्ष्मीबाई बसथांब्याजवळ बसची वाट पाहत असताना, एक तरुण तेथे धडकला. त्याने, ओळखलेस का? म्हणत बोलण्यास सुरुवात केली. पुढे आणखीन एक तरुण तेथे आला. दोघांनीही मित्र असल्याचे सांगून, पुढे चोरी होत असल्याचे सांगून दागिने घालून फिरू नको, असा सल्ला दिला. त्यामुळे दिनेश यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी अंगठी आणि चेन काढून रुमालात बांधून ठेवली. याच दरम्यान दुकलीने हातचलाखीने दागिने लंपास केले. पुढे काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी दागिने तपासले असता त्यांना मिळून आले नाही. यात, त्यांचे १ लाख ८९ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले आहेत. अखेर, शिर्डीवरून परतल्यानंतर २ जानेवारी रोजी त्यांनी या प्रकरणी सायन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.