Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेनचोरीसाठी कोलकात्यातील बेरोजगार आयात

By admin | Updated: February 3, 2016 11:42 IST

लोकलमध्ये प्रवासात प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रेल्वे पोलिसांना (जीआरपी) यश मिळाले आहे.

मुंबई : लोकलमध्ये प्रवासात प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रेल्वे पोलिसांना (जीआरपी) यश मिळाले आहे. प्रवासात चेन चोरणाऱ्या ६ जणांच्या टोळीला नुकतीच अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेन चोरण्यासाठी कोलकात्यातील बेरोजगार तरुणांना मुंबईत आणले जाते. या टोळीचा म्होरक्या कोलकात्यात असून, त्याला अटक करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेतील विशेष कृती दलाचे पथक रवाना करण्यात आले आहे. मुंबई क्राइम ब्रँच युनिट नंबर ६कडे आलोक सरदार, अबूल गाझी, बाबू हैदर, हैदरअली जाकिरअली, मौहिद्दीन मुल्ला, सद्दाम शेख हे १५ जानेवारी रोजी अटकेत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांच्या विशेष कृती दलाला (गुन्हे शाखा) मिळाली. त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीनुसार या आरोपींचा लोहमार्ग पोलिसांनी तपास केला असता मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाणे हद्दीतील चेन चोरीच्या गुन्ह्यात सामील असल्याने त्या सर्वांना २५ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्यांनी चोरीची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या सोन्याच्या चेन वितळवून लगडी करून विकल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्या माहितीच्या आधारे झवेरी बाजार येथील सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, सहाही जण सोन्याचे कारागीर असल्याचे सांगत सोन्याची लगडी विकत होते. त्याचप्रमाणे ७५ ग्रॅम वजनाच्या पाच लगडी दुकानात काम करणाऱ्याकडून हस्तगत केल्या. पोलीस आयुक्त (लोहमार्ग) मधुकर पाण्डे, पोलीस उप आयुक्त रूपाली अंबुरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलातील अधिकारी किरण मतकर, राहुल उडाणशिव, बाबा चव्हाण, गणेश क्षीरसागर व अन्य कर्मचारी तपास करत आहेत. (प्रतिनिधी)