Join us  

मुंबईत कोल्ह्यांची गणना रखडली, वनविभागाची दिरंगाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 2:50 AM

वनविभाग परवानगी देईना ; रेस्क्युईंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफतर्फे पत्रव्यवहार

सागर नेवरेकर मुंबई : कोल्ह्यांच्या गणनेसाठी मुलुंड येथील रेस्क्युईंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) या प्राणिप्रेमी संस्थेने पुढाकार घेतला आहे. परंतु वनविभागाकडून परवानगी मिळत नसल्यामुळे कोल्ह्यांची गणना आणि अभ्यास रखडला आहे.मुंबई शहर आणि उपनगरातील चारकोप, वर्सोवा, मढ जेट्टी, विक्रोळी आणि नवी मुंबई येथे खाडीलगतच्या कांदळवनांमध्ये कित्येक वर्षांपासून कोल्ह्यांचे अस्तित्व आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे थकलेले किंवा कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले कोल्हे कांदळवनाबाहेर पडतात. मानवी वस्तीमध्ये कोल्हे निदर्शनास आल्यावर प्राणिमित्र संस्था आणि संघटना त्यांना जीवनदान देण्याचे काम करतात. मुंबईतील कोल्ह्यांवर आजतागायत शास्त्रीय अभ्यास झालेला नाही.

१९१३ साली पहिल्यांदा मुंबईमध्ये कोल्हे दिसून आले. त्यांच्या आवाजाने कोल्ह्याचे वास्तव्य आहे असे लोकांना माहिती पडले. मात्र, कोल्ह्यांची इत्थंभूत माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. सध्या कांदळवनामध्ये राहत असलेल्या कोल्ह्यांचे आरोग्य, त्यांचे आजारपण याबद्दलही माहिती नाही. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोल्हा रेस्क्यूच्या घटना वाढत आहेत. त्यात उष्माघाताने बळी गेलेले कोल्हेही दिसून येतात.

रेस्क्युईंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले की, गेल्या वर्षी एकाचवेळी दोन कोल्हे पकडण्यात आले होते. त्या वेळी त्यांना एक वेगळा आजार असल्याचे निदर्शनास आले. पण, हा आजार इतर कोल्ह्यांमध्येही आहे का? याचा डाटा आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे याची माहिती घेणे आवश्यक आहे. 

गेल्या वर्षी कोल्ह्यांची गणना आणि अभ्यासासाठी परवानगी आणि निधी उपलब्ध करून देण्याकरिता वनविभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, संशोधनाचा विषय स्पष्ट नसल्याचे कारण देत, वनविभागाने गणनेला व अभ्यासाला परवानगी दिली नाही. पुन्हा एकदा वनविभागाकडे पत्रव्यवहार केला जाणार आहे. हा अभ्यास एक-दोन वर्षांपूर्ती मर्यादित नसून तो दीर्घकाळ चालणारा आहे.सहा कोल्हे वाचले

रॉ संस्थेने २०१७ पासून आजतागायत सहा जखमी कोल्ह्यांना वाचवले आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर रस्ते अपघातात सातपेक्षा अधिक कोल्ह्यांनी जीव गमावल्याची नोंद संस्थेकडे आहे. पूर्व दु्रतगती मार्गावर उन्हाळ्यात अनेकदा कोल्हे आढळतात. विक्रोळी ते मुलुंड पट्ट्यातील खारफुटीच्या जंगलात कोल्ह्यांचे वास्तव्य आहे. वर्षभरात या भागात पाच-सहा कोल्हे पकडले जातात.

टॅग्स :मुंबईवनविभाग