मुंबई : महाराष्ट्राने तामिळनाडू पॅटर्नप्रमाणे नॉन ट्रान्सप्लाण्ट आॅर्गन रिट्राव्हल सेंटर सुरू केल्यापासून २ जुलै रोजी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सेंटरमधून एका ब्रेन डेड महिलेचे अवयवदान झाल्याची घटना घडली आहे. मीरा रोड येथील उमराव रुग्णालयातून ३९ वर्षीय ब्रेन डेड महिलेचे अवयवदान तिच्या पतीने केले. २ जुलै रोजी दुपारी अडीच-तीनच्या सुमारास उमराव रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या ३९ वर्षीय महिलेच्या मेंदूचे कार्य बंद झाले, मात्र तिचे इतर सर्व अवयव कार्यरत होते. अशा परिस्थितीमध्ये ती महिला ब्रेन डेड असली तरी तिच्या अवयवांचे दान होऊ शकते, असे रुग्णालय प्रशासनाने तिच्या कुटुंबीयांना सांगितले. तिच्या पतीने पत्नीच्या दोन किडन्या, यकृत आणि डोळे दान केले. यामुळे पाच जणांना जीवनदान मिळणार आहे. मीरा रोड येथे राहणारी ३९ वर्षीय महिला घरामध्ये पडली. यामध्ये तिच्या डोक्याला जबर मार लागला. त्या अवस्थेमध्ये तिला जवळच्या एका नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. येथे तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे तिला उमराव रुग्णालयात हलविण्यात आले होते. येथे आणल्यावर तिचे सीटी स्कॅन करण्यात आले. यावेळी तिच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी झाल्याचे दिसून आले. रुग्णालयाने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याआधीच तिच्या मेंदूने कार्य करणे बंद केले. कुटुंबाच्या परवानगीने रुग्णालयाने ही माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीला कळवली, असे रुग्णालयाच्या डॉक्टर समीक्षा अहिरे यांनी दिली.दुपारी चार-साडेचारच्या सुमारास समितीचे कार्यकर्ते आणि केईएम, सायन आणि बॉम्बे रुग्णालयातील डॉक्टरांची टीम तिथे पोहोचली. नियमाप्रमाणे दोन तपासण्या झाल्यावर त्या महिलेला बे्रन डेड घोषित करण्यात आले. यानंतर डॉक्टरांच्या टीमने तिचे अवयव काढून घेतले. सायन रुग्णालयाच्या प्रतीक्षा यादीत असणारा रुग्ण शस्त्रक्रियेसाठी तंदुरुस्त नसल्यामुळे जसलोक रुग्णालयाच्या प्रतीक्षा यादीत असणाऱ्या रुग्णाला बोलावण्यात आले. बॉम्बे आणि जसलोक रुग्णालयातील रुग्णांना किडनी तर केईएम रुग्णालयातील रुग्णावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती समितीने दिली आहे. (प्रतिनिधी)
रिट्राव्हल सेंटरमधून पहिल्यांदाच कॅडेव्हर डोनेशन
By admin | Updated: July 5, 2014 04:11 IST