Join us

‘सी-सर्किट टुरिझम’ प्रकल्पाला मिळणार गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:05 IST

खा. संभाजीराजे; जेट्टी आणि वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या प्रस्तावास मान्यतालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्राला लाभलेली विस्तृत सागरी किनारपट्टी ...

खा. संभाजीराजे; जेट्टी आणि वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्राला लाभलेली विस्तृत सागरी किनारपट्टी आणि ऐतिहासिक जलदुर्गांचे वैभव जागतिक स्तरावर पोहोचावे यासाठी ‘सी-सर्किट टुरिझम’ प्रकल्पाची योजना आखण्यात आली आहे. यासाठी आवश्यक जेट्टी आणि वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता मिळाल्याची माहिती रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

यासंदर्भात केंद्रीय पुरातत्त्व विभाग आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसाेबत नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. मुंबई ते रायगड म्हणजेच ‘राज्याची राजधानी ते स्वराज्याची राजधानी’ या मार्गातील जलदुर्गांच्या पर्यटनासाठी आवश्यक जेट्टी व वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या प्रस्तावास बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. या सुविधेमुळे मुंबईहून समुद्रमार्गे खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, जंजिरा या जलदुर्गांना भेट देऊन रायगडावर जाता येईल, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जलदुर्गांच्या जेट्टी बांधणीचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. खांदेरी, पद्मदुर्ग, जंजिरा, सुवर्णदुर्ग आणि उंदेरी या जलदुर्गांना जेट्टी नसल्याने प्रवाशांना सुरक्षितपणे उतरण्यास मोठी अडचण होती. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातर्फे लवकरच याठिकाणी जेट्टी बांधणीच्या कामास सुरुवात होईल. तसेच अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याला फ्लोटिंग जेट्टी किंवा किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी लाकडी वॉक-वे उभारता येईल का, याविषयीही यावेळी चर्चा करण्यात आली. या सुविधा उपलब्ध करून दिल्यास शिवभक्त, इतिहास अभ्यासकांना याचा उपयोग होण्यासह पर्यटनवृद्धी होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल.

या बैठकीला केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका व्ही विद्यावती, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे संचालक नंबिराजन, केंद्रीय पुरातत्त्व पश्चिम विभाग प्रमुख नंदिनी साहू उपस्थित होते.