Join us  

धनत्रयोदशीनिमित्ताने दिवाळीची उत्साहात खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 4:16 AM

: मुंबईवर पावसाने संततधार धरलेली असली तरी, उत्साही मुंबईकर खरेदीसाठी बाहेर पडले.

मुंबई : मुंबईवर पावसाने संततधार धरलेली असली तरी, उत्साही मुंबईकर खरेदीसाठी बाहेर पडले. मुंबईच्या बाजारपेठांमध्ये शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी प्रचंड गर्दी होती. धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोने खरेदी करण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानांत गर्दी दिसून आली. यासह माहिम येथील कंदील गल्लीत, दादर येथील फूल बाजारात, कुर्ला येथील फटाक्यांच्या दुकानांत खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होती.

दिवाळीत पाऊस पडत असल्याने विशेष छत्रीच्या आकाराचे कंदील बाजारात आले आहेत. यासह पारंपरिक पद्धतीचे कंदील, इको-फ्रेंडली कंदिलांची खरेदी केली जात आहे. आकर्षक दिवे, रांगोळी, सुगंधी उटणे, कपडे, भेटवस्तू यांच्या खरेदीसाठीही ग्राहकांची झुंबड उडाली होती.

दिवाळीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी वेगवेगळ्या आॅफर ठेवल्या आहेत. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर लहान-मोठ्या वस्तू मोफत किंवा कमी किमतीत दिल्या जात आहेत. तर, किराणा दुकानदारांनीही विशिष्ट रकमेच्या खरेदीवर सवलत घोषित केली आहे.

ऑनलाइन शॉपिंग तेजीत

ऑफिसला सुट्टी नाही, प्रवासात वेळ जाणे अशा धकाधकीच्या जीवनात लोकांना आॅनलाइन शॉपिंगचा आधार मिळाला आहे. ऑनलाइन शॉपिंगवर कोट्यवधींची खरेदी केली जात आहे. मोबाइल, टीव्ही, स्पीकर, घड्याळे, कपडे, दिवे आणि रांगोळीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.

टॅग्स :दिवाळी