मुंबई : खासगी बस चालकांना ‘शहर प्रवेश बंदी’ या निर्णयामुळे, प्रवाशांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई थांबविण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे. मात्र, कारवाई थांबविण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय, मंगळवार आणि बुधवारी होणारा संप मागे घेणार नसल्याचे, मुंबई बस मालक संघटनेने स्पष्ट केले आहे. यामुळे तूर्तास तरी खासगी बसने प्रवास करणाºया प्रवाशांच्या अडचणी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासोबत, वाहतूक पोलीस विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि संघटनेच्या शिष्टमंडळाची संयुक्त बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत स्कूलबसवर कारवाई टाळतानाच, १० दिवस खासगी बसवरील कारवाई थांबविण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले.मात्र, ‘शहर प्रवेश बंदी’ आदेशावर चर्चा करताना, कारवाई थांबवण्याचे लेखी आश्वासन मिळाले नसल्याचे संघटनांनी सांगितले. त्यामुळे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे. त्यामुळे तूर्तास तरी वाहतूक पोलीस आणि खासगी बस चालक यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.वाहतूक पोलीस आणि खासगी बसचालक यांच्यातील वादामुळे आम्हाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. खासगी बसचे मुंबईपर्यंतचे तिकीट काढल्यानंतरही, वाशी येथे उतरून पर्यायी वाहनाने शहरात प्रवेश करावा लागत असल्याची तक्रार अनेक प्रवाशांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आर्थिक त्रासासह मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.विद्यार्थ्यांच्या बसवर कारवाईएन. एम. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक पनवेल येथे फिल्ड व्हिझिटसाठी गुरुवारी रात्री गेले होते. विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास विलेपार्ले पश्चिम येथे संपणार होता. मात्र, वाहतूक पोलिसांनी पार्ले पूर्वेकडे बस थांबवित बसवर कारवाई केली. तब्बल दोन तासांहून अधिक काळ हा गोंधळ सुरू होता. बसमध्ये सुमारे ४५-५० विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. महाविद्यालयील शिक्षकांनी संबंधित पोलिसांना विनंती केली, तरीदेखील बस अडवून ठेवण्यात आली होती, अशी माहिती खासगी ट्रॅव्हल्स कंपनीचा चालक कृष्णा याने दिली.मुंबई वगळून उर्वरित महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील संबंधितांना मंगळवारी आणि बुधवारी बस मुंबईकडे रवाना करू नका, असे सांगण्यात आले आहे. संपाला अखिल गुजरात प्रवासी वाहन संचालक महामंडळाने पाठिंबा दिल्याची माहिती मुंबई बस मालक संघटनेने दिली.नियमाविरोधात प्रवेश बंदीमोटार वाहन कायदा १९८८, नियम ११च्या तरतुदीनुसार मोठ्या प्रमाणात रस्ते बंदीचे आदेश पोलीस आयुक्तांना नसल्याचे मुंबई बस मालक संघटनेने सांगितले. खासगी बस संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली आहे. त्यात १० दिवस कारवाई थांबविण्याचे आश्वासन दिले आहे.- अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त, वाहतूक विभाग
बस संघटना संपावर ठाम, लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 05:07 IST