Join us  

मुंबईकरांच्या खांद्यावर आता मालमत्ता कराचे ओझे, केवळ सर्वसाधारण कर माफ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 4:42 AM

BMC News : पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता कर माफ करण्यात आल्याचा अध्यादेश २०१९ मध्ये राज्य सरकारने काढला. प्रत्यक्षात मालमत्ता कराचे थकीत बिल हातात पडल्याने या मालमत्ताधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

मुंबई - पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता कर माफ करण्यात आल्याचा अध्यादेश २०१९ मध्ये राज्य सरकारने काढला. प्रत्यक्षात मालमत्ता कराचे थकीत बिल हातात पडल्याने या मालमत्ताधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत महापालिकेने नुकत्याच काढलेल्या परिपत्रकात मालमत्ता करतील केवळ सर्वसाधारण कर माफ असून विविध प्रकारचे कर वसूल करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घेऊन मतदारांना खूश केले होते. मात्र, याबाबत अध्यादेश काढला गेला नव्हता. त्यामुळे या माफीच्या  अंमलबजावणीवरून पालिका प्रशासनामध्येही संभ्रमाचे वातावरण होते. त्यानंतर २०१९ मध्ये काढलेल्या अध्यादेशानुसार सर्वसाधारण कर माफ असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.त्यानुसार मालमत्ता कराचे देयकात पालिकेकडून विविध प्रकारचे दहा कर आकारले जातात. त्यापैकी फक्त सर्वसाधारण कर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे करमाफी प्रत्यक्षात लागू झाल्यानंतरही मुंबईकरांना शून्य बिल येणार नाही. पालिका मुंबईकरांना ज्या सेवासुविधा देत असते, त्याकरिता हे विविध कर आकारले जातात. त्याची आकारणी मालमत्ता करावर टक्केवारीनुसार होते. हे सर्व कर मुंबईकरांकडून वसूल केले जातील. पालिकेला मिळताे तीन टक्के निधीपाणीपट्टी, जल लाभ, मलनिस्सारण, वृक्ष, पथकर असे मालमत्ता कराबरोबर आकारले जाणारे अन्य कर कायम आहेत. रोजगार हमी आणि राज्य शिक्षण कर या दोन करांमधून जमा झालेला निधी राज्य सरकारला दिला जातो, तर हा कर गोळा केल्याबद्दल दोन टक्के निधी पालिकेला मिळतो. सन २०१९-२० मध्ये पाच हजार ६०० कोटींपैकी केवळ ४१०० कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाले, तर २०२०-२०२१ मध्ये ६७८८ कोटींपैकी आतापर्यंत डिसेंबरअखेरपर्यंत सुमारे आठशे कोटी जमा झाले आहेत.पाचशे चौरस फुटांच्या मालमत्तांचे सर्व कर माफ केल्यास पालिकेला साडेतीनशे कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असते.

टॅग्स :मुंबईकर