Join us  

लोकलसेवेचा बोजवारा..! मोटरमनच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांचा असहकार, आज काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 5:41 AM

मध्य रेल्वेच्या १४७ हून अधिक लाेकल फेऱ्या रद्द; प्रवाशांचे हाल

मुंबई : मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी शुक्रवारी नकळतपणे सिग्नल मोडला. कारवाई होईल, या भीतीपोटी भायखळा येथे रेल्वे रूळ ओलांडताना त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या मोटरमननी ‘जादा काम’ करणे बंद केले. याचा फटका शनिवारी मध्य रेल्वेच्या लोकलसेवेला बसला आणि १४७ हून अधिक लोकल सेवा रद्द झाल्या. त्यामुळे लोकलचा बट्ट्याबोळ उडाला अन् प्रवाशांनी थेट रेल्वे रुळांवर उतरून पायी जाणे पसंत केले.  

शनिवारी सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल विलंबाने धावत होत्या. या व्यतिरिक्त कल्याण दिशेला जाणाऱ्या लोकलही रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी अनेक लोकल एकाच ठिकाणी ३० ते ४० मिनिटे थांबल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सायंकाळी तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिददरम्यान खोळंबलेल्या लोकलची रांग लागली होती. ३० मिनिटांहून अधिक काळ लोकल एकाच ठिकाणी थांबल्याचे प्रवाशांनी सांगितले. प्रवासी लोकलमधून खाली उतरत रुळांवरून चालत पुढील स्थानकापर्यंत जात होते. 

आज काय होणार? बहुसंख्य मोटरमननी अतिरिक्त काम करणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे शनिवारी पाहावयास मिळाले. हा परिणाम रविवारीही उद्भवण्याची शक्यता असून त्यात मेगाब्लॉकची भर पडणार आहे.

मध्य रेल्वे म्हणते...मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक मोटरमन शर्मा यांच्या अंत्यदर्शनाला गेले. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. 

टॅग्स :मुंबई लोकल