Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर ,आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्यावर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 19:34 IST

डॉक्टर , नर्सेस ,आरोग्य कर्मचारी यांना घरातून बाहेर काढू नये ,अन्यथा संबधितांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे .

 काही ठिकाणी डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मानवतेच्या दृष्टीने तर हे अत्यंत चुकीचे आहेच परंतु नियमबाह्यही आहे. घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावे. अन्यथा साथरोग नियंत्रण कायद्यानुसार संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल, असे शासनाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. सध्या करोना विषाणु साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे करताना त्यांना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी त्यांच्यामार्फत तसेच प्रशासनामार्फत घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाही. असे असतानाही काही घरमालक, हाऊसिंग सोसायट्या त्यांच्याकडे भाड्याने राहणारे डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना घर खाली करण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे पूर्णतः चुकीचे असून संबंधीत घरमालक, हाऊसिंग सोसायट्या यांनी असे करु नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. एखादे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटी असे करत असल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. भाड्याच्या घरात राहणारे डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना असा अनुभव आल्यास त्यांनी आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.