शौकत शेख डहाणूडहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील अंगमेहनत करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी, डायमेकर्स, मच्छीमार आणि बागायतदारांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशकारी वाढवण बंदराच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी सरकारला माझ्यावर बुलडोझर चालवावा लागेल. मी आणि काँग्रेस पक्ष गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून हे विनाशकारी बंदर कायमचे हटविण्यासाठी सर्व प्रकारच्या आंदोलनात सहभागी होऊन सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करीन, अशी स्पष्ट ग्वाही माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी वाढवण येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सभेत दिली.पश्चिम किनारपट्टीवरील वाढवण बंदराच्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आणि वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने सुरू केलेल्या आंदोलनाला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यासाठी राजेंद्र गावित आले असताना वाढवण (टिघरेपाडा) शाळेत झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला बंदरविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबन चुरी, विनित पाटील, मंगेश चौधरी, नरेंद्र पाटील, बालकृष्ण पाटील, केसरीनाथ पाटील, विकास मडवे, सागर चौधरी, परशुराम पाटील, अशोक पाटील, चिंचणीचे उपसरपंच केतन पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते. चिंचणीपासून धा. डहाणूपर्यंतची सर्व गावे, खेड्यापाड्यांच्या कार्यकर्त्यांनी वाढवण बंदर झाल्यास येथील शेती, बागायती, मासेमारी तसेच डायमेकिंगसारखा लघुउद्योग कसा नष्ट होणार आहे, याची माहिती दिली. वाढवण बंदराच्या ठिकाणी माशांच्या प्रजोत्पादनाचे समृद्ध ठिकाण असून येथे किमती शिवंड मासे मोठ्या प्रमाणात मिळतात. शिवाय, येथील किनारपट्टीवर पर्यावरणाचा समतोल ठेवणारी आणि समुद्राचे पाणी शुद्ध करणारी लाखो तिवरे (मॅनग्रुव्हज) तोडली जाणार आहेत. हजारो पर्यटकांना आकर्षित करणारे निसर्गसौंदर्य नष्ट होण्याची भीती असंख्य कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित म्हणाले की, १८ वर्षांपूर्वी तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारने पी अॅण्ड ओ कंपनीमार्फत येथे होऊ घातलेले बंदर, हा पर्यावरणाचा पट्टा अतिसंवेदनशील भाग असून तसेच मासेमारीच्या दृष्टीने हा परिसर अतिशय समृद्ध असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाल्याने न्यायालयाच्या निर्णयामुळे हे बंदर रद्द केले होते. सेना आता या बंदराला विरोध करीत आहे. मात्र, ज्या वेळी वाढवण बंदर उभारणीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला, त्या वेळी शिवसेनेने तेथे विरोध करणे आवश्यक होते. तेथे ते शांत राहिले. म्हणजेच शिवसेनेची दुटप्पी भूमिका असून त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. बंदर विरोधाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असून पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केल्याचे सांगून विधानपरिषदेतही आ. कपिल पाटील व आ. आनंद ठाकूर हेदेखील हा प्रश्न मांडून सभागृहात चर्चा घडवून आणतील, असे गावित म्हणाले.ग्रामस्थ आंदोलनासाठी सज्जवाढवण येथे बंदर होऊ नये म्हणून चिंचणी, वाढवण, बरोर, गुंगवाडे, तडियाले, खाडापोखरण, धा. डहाणू आदी ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत एकमताने ठराव घेण्यात आले असून येथील हजारो ग्रामस्थ आंदोलनासाठी सज्ज झाले आहेत.
बंदर उभारण्यापूर्वी बुलडोझर माझ्यावर चालवा
By admin | Updated: July 6, 2015 04:18 IST