राजेंद्र वाघ ल्ल शहाडछिन्नी-हातोड्याचे घाव घालून दगडापासून उखळ, पाटा-वरवंटा व जात आदी वस्तू तयार करणाऱ्या पाथरवट समाजाची आता फक्त जगण्यासाठी धडपड सुरु आहे. कारण या सर्व दगडी वस्तूंची जागा आता मिक्सर, ग्राईंडर सारख्या विविध इलेक्ट्रॉनिक साधनांनी घेतल्याने आणि या दगडी वस्तूंना मागणी नसल्याने हा व्यवसाय लोप पावत चालला आहे.घरात धान्य दळणे, मिरची कांडणे व मसाला वाटणे अशी सर्व कामे उखळ, पाटा-वरवंटा व जातं या द्वारे घरीच केली जात असत. परंतु आता स्वयंपाक घरात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी साधनांनी या गृहोपयोगी दगडी वस्तूंना हद्दपारच केले आहे. मात्र या साधनांमुळे गृहिणींचे काम अधिक सोपे झाले असले तरी पाथरवट समाजाचा रोजगार मात्र काढून घेतला आहे.पूर्वी पाथरवट गावोगावी भटकंती करून उखळ, पाटा-वरवंटा, जात अशा विविध गृहपयोगी दगडी वस्तू विकायचे किंवा मागणी नुसार घडवून द्यायचे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मग ते तुटपुंजे का असेना समाधानाने जीवन जगायचे. परंतु आता या वस्तूंची जागा इलेक्ट्रॉनिक साधनांनी घेतल्याने हा व्यवसायच लोप पावत चालला असून, पाथरवट समाजातील नवी पिढी अन्य व्यवसायाकडे वळली आहे.लक्ष्मी म्हणून मागणीमहाराष्ट्रीयन संस्कृतीत घरात ‘जातं’ आणि ‘उखळ’ या वस्तूंना लक्ष्मी मानले जाते. लग्न समारंभात त्यांना विशेष मान आहे. नवीन घर बांधताना कोपऱ्यात उखळ किंवा जाते बसविले जाते. त्यासाठी कधी तरी या साहित्याची मागणी केली जाते. अलिकडे क्वचितच मसाला वाटण्यासाठी छोटे खलबत्ते विकत घेतले जातात.असा आहे पाथरवट समाजमहाराष्ट्रात पाथरवट समाजाची लोकसंख्या ठाणे व पालघर जिल्ह्यात आहे. हा समाज असंघटीत असून शिक्षणाचे प्रमाण हे अत्यल्प असल्याने समाजात अज्ञान व अंधश्रद्धेचे प्रमाण मोठे आहे. समाजात प्रथा, परंपरा व चालीरितींना महत्व असून तीच त्यांची जीवन पद्धती आहे. शासनाने पाथरवट समाजाच्या भटक्या, विमुक्त जमातीत समावेश केला असून समाजासाठी अनेक शासकीय योजना आहेत. मात्र या अद्यापही या योजनांची पुरेशी माहिती समाजाला नाही. यात जे काही मुठभर शिकले तेच त्याचा फायदा घेतात.रिक्षा,सेंट्रिंग काम, धुणी - भांडीपाथरवट समाजाच्या पारंपारिक व्यवसाय लोप पावत चालला आहे. समाजातील मुलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असल्याने ते आता रिक्षा चालविणे, गवंडी-सेंट्रींग अशी विविध कामे करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. तर महिला धुणी-भांडी किंवा रोजंदारीच्या कामाला जाऊन संसाराला हातभार लावतात.आता आमचा रोजगार संपला आहे. बगीच्यात किंवा घराच्या सजावटीसाठी बिल्डर लोकांकडून दगड घडवून घेतले जातात. आम्हीही मागणीनुसार वस्तू तयार करून देतो. आता शासनाने नवीन पिढीसाठी काहीतरी करावे अशी माफक अपेक्षा.- नामदेव दहाके, ज्येष्ठ नागरीक
उखळ, पाटा-वरवंटा होतोय विस्मृतीत जमा
By admin | Updated: March 25, 2015 23:08 IST