Join us

आरक्षित भूखंडावर बांधकामे

By admin | Updated: May 17, 2015 23:32 IST

महापालिका हद्दीतील खुल्या जागा, आरक्षित भूखंडांवर सर्रास अवैध बांधकामे होत असून तक्रारीला प्रभाग अधिकारी केराची टोपली दाखवित आहेत

उल्हासनगर : महापालिका हद्दीतील खुल्या जागा, आरक्षित भूखंडांवर सर्रास अवैध बांधकामे होत असून तक्रारीला प्रभाग अधिकारी केराची टोपली दाखवित आहेत. यामुळे नवनियुक्त आयुक्त मनोहर हिरे पाडकाम कारवाई करून भूमाफियांवर वचक बसवत असल्याचा समज खोटा ठरला आहे. उल्हासनगरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने विशेष अध्यादेश काढला आहे. मात्र, पालिकेच्या नाकर्तेपणामुळे अध्यादेशाचे काम ठप्प असून न्यायालय व शासनाचा आदेश पायदळी तुडविला जात आहे. नगरसेवकांनी भर महासभेत अवैध बांधकामांची यादी पालिका आयुक्तांना दिली होती. आयुक्तांनी पाडकाम कारवाईनंतर अहवाल महासभेसमोर सादर करण्याचे वचन दिले होते. ते वचन हवेत विरले असून प्रभाग अधिकारीच संरक्षण देत असल्याचे उघड झाले आहे. अवैध बांधकामे कोसळून मजुरांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या असून निकृष्ट बांधकामांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता विजय ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. कॅम्प नं-५, बँक आॅफ इंडियाजवळ भररस्त्यात माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने बांधकामे उभी राहत आहेत. रस्त्यावरील बांधकामावर पाडकाम कारवाईसाठी झनक नावाच्या तरुणाने उपोषणाचा इशारा दिला आहे. तर गेल्या आठवड्यात अवैध बांधकामांच्या निषेधार्थ भाजपाचे युवा अध्यक्ष संजय सिंग यांच्यासह कार्यकर्त्यांनी पालिकेसमोर उपोषण केले आहे. तत्कालीन पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी अवैध बांधकामांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. विशेष पथकाने भूमाफियांच्या बांधकामांवर पाडकाम कारवाई केली. मात्र, त्यानंतर पथक दिसेनासे झाले असून अवैध बांधकामांची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यासह बिट निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांच्यावर देण्यात आली आहे. मात्र, कारवाई न होता अवैध बांधकामांना आश्रय दिल्याची टीका होत आहे. अवैध बांधकामे होत असतानाही पालिका प्रशासन त्याकडे काणाडोळा करीत आहेत.