Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या परवानगीविना इमारत

By admin | Updated: June 7, 2015 05:12 IST

पालिकेकडे इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव प्रलंबित असताना काळबादेवी येथील एका जमीन मालकाने परस्पर सहा मजल्यांची नवीन इमारत

मुंबई : पालिकेकडे इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव प्रलंबित असताना काळबादेवी येथील एका जमीन मालकाने परस्पर सहा मजल्यांची नवीन इमारत उभी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे़ लोखंडी बीमचा वापर करून बांधण्यात आलेली ही इमारत धोकादायक असल्याने दक्षता विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे़पोफळीवाडी लेन क्ऱ १ येथे प्रेम भवन नंबर ११ ही जुनी इमारत आहे़ मोडकळीस आलेल्या या इमारतीच्या दुरुस्तीसाठी मालकाने पालिकेकडे परवानगी मागितली होती़ विकास आराखड्यानुसार इमारतीच्या बाहेरून जागा सोडण्यास मालक तयार नसल्याने हा विषय स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने ठेवला होता़ त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, समाजवादीचे गटनेते रईस शेख आणि भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी शुक्रवारी या जागेची पाहणी केली़मात्र जुन्या इमारतीच्या जागी लोखंडी बीम, लाद्यांचा वापर करून चक्क नवीन इमारत उभारण्यात आल्याचे सदस्यांना दिसून आले़ विभाग कार्यालयाने हे बांधकाम तत्काळ थांबविण्याची नोटीस संबंधित जमीनमालकाला पाठविली होती़ तसेच महाराष्ट्र नगररचना अधिनियमाखाली नोटीसही बजाविण्यात आली होती़ स्थायी समिती सदस्यांच्या तक्रारीनुसार दक्षता विभागामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी आज दिले़ (प्रतिनिधी)