Join us

‘विकास फिनले’वर बिल्डरचा डोळा!

By admin | Updated: April 18, 2015 01:46 IST

काळाचौकी येथील विकास फिनले टॉवर या ३० वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या इमारतीच्या मालमत्ता कार्डावर सोसायटीचे बेकायदा नाव लावून तेथे पुनर्विकासाची योजना राबवण्याचा डाव एका बिल्डरने रचला होता.

मुंबई : काळाचौकी येथील विकास फिनले टॉवर या ३० वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या इमारतीच्या मालमत्ता कार्डावर सोसायटीचे बेकायदा नाव लावून तेथे पुनर्विकासाची योजना राबवण्याचा डाव एका बिल्डरने रचला होता. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील लँड रेकॉर्ड विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे हा डाव उधळला गेला आहे.याबाबत अराईज इंडिया फाउंडेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित आणि मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी शैला ए. यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. विकास फिनले टॉवर ही इमारत उभी असलेली मालमत्ता मुळात पारशी ट्रस्टच्या मालकीची होती. त्यांनी विकास फिनले मिल्सला भाडेतत्त्वावर ही जमीन दिली. कालांतराने मिल बंद पडल्यावर तेथे विकास फिनले टॉवर ही इमारत १९८४ साली उभी राहिली. मात्र आता मालमत्ता कार्डावर सोसायटीचे नाव लावून त्याचा पुनर्विकास करण्याकरिता विकास नियंत्रण नियमावलीच्या ३३ (९) कलमाखाली प्रस्ताव सादर करण्याचा एका स्थानिक बिल्डरचा प्रयत्न सुरू होता. याकरिता मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील सुपरिटेंडन्ट आॅफ लँड रेकॉर्ड यांच्या कार्यालयातील वरिष्ठांना हाताशी धरण्यात आल्याचा दावा फाउंडेशनने केला आहे. लाचलुचपत विभागाने या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी तक्रार दाखल केलेली आहे. (विशेष प्रतिनिधी)मुंबई शहराचे सुपरिंटेडन्ट आॅफ लँड रेकॉर्ड जयंत निकम म्हणाले की, विकास फिनले सोसायटीचे नाव मालमत्ता कार्डावर लावलेले नाही व त्याकरिता आमच्या विभागाकडून कुणालाही अवाजवी मदत केलेली नाही. याबाबत तक्रार आली असून, कायदेशीर बाबी तपासल्याखेरीज कुठल्याही प्रकरणात मालमत्ता कार्डावर नाव लावले जात नाही.