Join us  

घर हस्तांतरानंतर 5 वर्षांपर्यंत बिल्डरची जबाबदारी; त्रुटी ३० दिवसांत दूर करणे राहणार बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 9:54 AM

घरांचे हस्तांतरण झाल्यापासून ५ वर्षांपर्यंत राहिलेल्या त्रुटी बिल्डरला स्वखर्चाने ३० दिवसांत दुरुस्त करून द्याव्या लागतात.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घर हस्तांतरणानंतर ५ वर्षांपर्यंत तक्रारी सोडविण्याची जबाबदारी बिल्डरची असते. याची गरज भासू नये यासाठी प्रकल्पाची टप्पेनिहाय तपासणी करण्यासोबतच अंतिम टप्प्यात ३ पद्धतीने तपासणी करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा प्रस्तावित आहे. सुरुवातीला ही यंत्रणा मार्गदर्शक असली तरी महारेरा सर्व प्रकल्पांना ही यंत्रणा बंधनकारक करणार आहे. याचा फायदा घर खरेदीदारांना होईल, अशी माहिती महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी दिली. 

घरांचे हस्तांतरण झाल्यापासून ५ वर्षांपर्यंत राहिलेल्या त्रुटी बिल्डरला स्वखर्चाने ३० दिवसांत दुरुस्त करून द्याव्या लागतात. यामुळे ग्राहक हित जपले जात असले तरी मुळात तशी वेळच येऊ देऊ नये, अशी महारेराची भूमिका आहे. म्हणूनच बांधकामांबाबत कार्यपद्धती ठरविण्यासाठी काम सुरू आहे. घरांची गुणवत्ता तपासण्यासाठी एजन्सीची नेमणूक केली जाईल. या यंत्रणेमार्फत बांधकामांची गुणवत्ता तपासली जाईल.

 बांधकामात राहिलेल्या त्रुटी दूर करण्याची गरज भासू नये, असा रिअल इस्टेट क्षेत्रातील बांधकामांबाबत गुणवत्ता आश्वासन अहवालाचा आराखडा विकसित करण्यासाठी  सल्लामसलत पेपर महरेराने जाहीर केला आहे.  महारेराने या क्षेत्रातील तज्ज्ञ, जागतिक पातळीवरील उत्तमोत्तम पद्धती व प्रधानमंत्री आवास योजनेतील याबाबतच्या तरतुदी या अनुषंगाने करण्यात आलेल्या चर्चांच्या आधारे हा सल्लामसलत पेपर तयार केलेला आहे.  जनतेने ३१ डिसेंबर पर्यंत suggestions.maharera@gmail.com या ई-मेलवर, या अनुषंगाने त्यांचा सूचना पाठवाव्या, असे आवाहन महारेराने केले आहे. 

यंत्रणा काय करणार ?बांधकामांच्या विविध पातळ्यांवर ज्या चाचण्या घेतल्या जातात त्यांचे अहवाल, याबाबतच्या नोंदी असलेले रजिस्टर याचीही टप्पेनिहाय नियमित तपासणी यंत्रणेकडून केली जाणार आहे. या चाचण्यांसाठी प्रकल्पस्थळी व्यवस्था आहे की बाह्य स्रोतांचा वापर केला जातो, त्याचेही संनियंत्रण त्रयस्थ यंत्रणा करणार  आहे.

 काय मदत होईल? तपासणी केल्यास प्रकल्पातील त्रुटी निदर्शनास येऊ शकतात. यंत्रणेने प्रकल्पाच्या विविध कामातील त्रुटींच्या कामनिहाय, कंत्राटदारनिहाय नोंदी केल्यास, त्यांच्या दुरूस्तीसाठी आणि झालेल्या कामांची खात्री करून घेण्यासाठी मदत होऊ शकते.