Join us

‘सीएसआर’ फंडातून गरजूंसाठी घरे बांधा

By admin | Updated: February 17, 2017 02:34 IST

देशातील १०० जिल्हे विकसित करण्यासाठी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. मात्र त्यासाठी

मुंबई : देशातील १०० जिल्हे विकसित करण्यासाठी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. मात्र त्यासाठी देशातील कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या उद्योग समाज बांधिलकी (सीएसआर) फंडाची मदत करण्याचे साकडे संस्थेने गुरुवारी पत्रकार परिषदेतून घातले आहे. पब्लिक-प्रायव्हेट-पीपल पार्टनरशिप या माध्यमातून जिल्ह्यांचा विकास करायचा असून, त्यासाठी इम्पॅक्ट ५०-५० या उपक्रमाची घोषणा संस्थेने या वेळी केली. संस्थेचे कार्यकारी संचालक राजन सॅम्युएल म्हणाले की, या उपक्रमातून घर आणि स्वच्छ भारत अभियान राबविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. सरकारने सन २०२२पर्यंत देशातील प्रत्येकाला राहण्यास घर मिळवून देण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यासाठी ११ कोटी घरांचा विकास करणे गरजेचे आहे. हॅबिटॅटने आतापर्यंत १ लाख ७० हजारांहून अधिक घरे बांधली व दुरुस्त केली आहेत. केंद्र सरकारप्रमाणेच संस्थाही देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि पुरेसे घर पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत संस्थेने १ लाख ९५ हजार कुटुंबांना चांगले घर, स्वच्छतागृह उपलब्ध करून दिल्याचा दावाही त्यांनी केला. गेल्या दोन वर्षांत देशातील ४ हजार १११ नॉन-पीएसयू आणि ८४ पीएसयू कंपन्यांनी सीएसआरवर काही खर्च केला नसल्याची खंत संस्थेने व्यक्त केली. संबंधित उद्योग संस्थांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सीएसआर फंडाची मदत करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. २०२० सालापर्यंत देशातील अत्यल्प उत्पन्न गटात असलेल्या ५ लाख नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवत, त्यांना सुरक्षित आणि चांगले घर मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे लक्ष्य संस्थेने समोर ठेवले आहे. (प्रतिनिधी)