- मनोहर कुंभेजकर मुंबई - मुंबई क्रिकेट बोर्डाचे आधारस्तंभ शरद पवार यांच्या नावाने क्रिकेट संग्रहालय बांधण्याची तयारी सुरू झाली आहे.एमसीएने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाने कांदिवलीमध्ये एक भव्य क्लब बांधला आहे. त्यासोबतच त्यांच्या नावाने बोरिवलीत एक क्रिकेट संग्रहालय देखील बांधावे अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे केली आहे.
जेणेकरून क्रिकेटमध्ये आपले करियर करत असलेली तरुण पिढी त्या क्रिकेट संग्रहालयापासून प्रेरणा घेतील आणि "मलाही सचिन तेंडुलकर बनायचे आहे" असा विचार करून तसा प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपण गेल्या १५ वर्षांपासून येथे 'सचिन तेंडुलकर क्रिकेट संग्रहालय' बांधण्यासाठी प्रयत्नशील आहे. आमदार असताना त्यांनी या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून आपली मागणी पूर्ण व्हावी आणि बोरिवलीमध्ये सचिन तेंडुलकर क्रिकेट संग्रहालय स्थापन व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. परंतू तेव्हापासून त्यांची मागणी प्रलंबित आहे. दरम्यान, आता मुंबई क्रिकेट बोर्डाचे आधारस्तंभ शरद पवार यांच्या नावाने क्रिकेट संग्रहालय बांधण्याची तयारी सुरू झाली असतानाच, गोपाळ शेट्टी यांनी पुन्हा एकदा त्यांची ही मागणी नव्याने लावून धरली आहे.
शरद पवारांच्या नावाने क्रिकेट संग्रहालय बांधले तर मला खूप आनंद होईल. त्यांच्या नावाला माझा आक्षेपच नाही, पण गेल्या १५ वर्षांपूर्वीच्या माझ्या मागणीचा पुनर्विचार केला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.