मुंबई : पहिल्याच पावसाने नाल्यांची सफाई व रस्त्यांच्या सुमार कामांचे पितळ उघडे पाडले़ या प्रकरणी प्रशासनाला जाब विचारण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली़ परंतु निवडणुकीच्या काळात हा मुद्दा सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीलाही अडचणीत आणणारा असल्याने चर्चा टाळून महापौरांनी बहुमताच्या जोरावर अर्थसंकल्प मंजूर केला़ यामुळे संतप्त विरोधी पक्षांनी महापौरांच्या या मनमानीचा निषेध करीत सभात्याग केला़लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे पालिकेचा अर्थसंकल्प रखडला़ मात्र पालिका महासभेची मंजुरी मिळल्याशिवाय अर्थसंकल्पातील तरतूद खर्च करता येत नाही़ याचा फटका विकासकामांना बसत असल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधींची गोची झाली आहे़ त्यामुळे सन २०१४-२०१५ चा अर्थसंकल्प पालिका महासभेपुढे आज मंजुरीसाठी आणण्यात आला़पालिकेच्या परंपरेनुसार अर्थसंकल्पावर चर्चा होणे अपेक्षित आहे़ अभ्यासू नगरसेवक प्रशासनाच्या कारभारावर टीकाटिप्पणी, तसेच नवीन योजनांबाबत सूचना करतात़ परंतु विरोधी पक्षांना चर्चेची संधी डावलून महापौरांनी बहुमताच्या जोरावर अर्थसंकल्पाला मंजुरी दिली़ याविरोधात ‘महापौर हाय हाय’, ‘नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी’, अशी घोषणाबाजी करीत काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला़ (प्रतिनिधी)
अर्थसंकल्पाला चर्चेविनाच मंजूरी
By admin | Updated: July 5, 2014 03:56 IST