Join us  

भाऊ म्हणताय, अन ओबीसी आरक्षणावर डल्ला मारता; ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगें याचा आर्त सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 7:42 PM

असा सणसणीत सवाल ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश ( अण्णा ) शेंडगे यांनी येथे केला.

श्रीकांत जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ओबीसी आरक्षणातील घुसखोरी आम्ही कदापि सहन करणार नाही. जरांगे पाटील यांची भूमिका दररोज बदलतेय. ओबीसीना ते भाऊ म्हणतात आणि आमच्याच कुणबी ओबीसी आरक्षणावर डल्ला मारता, असा सणसणीत सवाल ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश ( अण्णा ) शेंडगे यांनी येथे केला.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. सत्ता, साधन संपत्तीचे समान वाटप होण्यासाठी प्रथम जातनिहाय जनगणना करा, अशी मागणी करीत मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिल्यास फार मोठा उद्रेक होईल, असा थेट इशारा ही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी मराठा समाजाने लावून धरली आहे. राज्य शासनाने त्यासंबंधी दोन शासकीय आदेश ५ आणि ७ सप्टेंबर २०२३ रोजी तातडीने काढलेले आहेत. त्याचवर मराठा समाजाचे आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्राविषयी बदललेली भूमिकायाविषयी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश ( अण्णा ) शेंडगे यांनी शुक्रवारी पत्रकार संघात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी कुणबी नेते चंद्रकांत बावकर उपस्थित होते. 

मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण म्हणजे सामाजिक आरक्षण बिघडवण्याचा प्रयत्न आहे. बिहार राज्याने सर्वांचे विरोध डावलून जातनिहाय जनगणना केली. महाराष्ट्र सरकारने सुद्धा जातनिहाय जनगणना करायला हवी आहे. ही जातनिहाय जनगणना करण्यास सरकार का घाबरते ? असा सवाल त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने ओबीसीना पैसा दिला. मात्र महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसीसाठी एक पैसा दिला गेलेला नाही. मराठ्यांना आरक्षण देण्यापूर्वी ओबीसी, मागासवर्गीय यांचा अनुशेष भरून काढा. 

आधीच ५२ टक्के ओबीसी लोकसंख्येला फक्त २७ टक्के एवढे तुटपुंजे आरक्षण आहे. यामध्ये सर्व ओबीसी जातींना पुरेसा लाभ मिळत नाही. त्यामुळे  ओबीसी आरक्षणात सर्व क्षेत्रात सत्ता हातात असलेल्या मराठा समाजाचा समावेश करणे म्हणजे ओबीसी समाजाला समानतेचा हक्क नाकारणे आहे. मराठ्यांना ओबीसी आरक्षणाच्या पंगतीत बसविल्यास आम्हाला अन्नाचा कण ही मिळणार नाही. यासंदर्भात येत्या १२ तारखेला ओबीसी नेत्यांची एक बैठक मुंबईत आयोजित केली आहे. यावेळी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल असेही शेंडगे यांनी यावेळी स्पष्ट केले.