Join us  

गोरगरिबांच्या उद्योगचक्राचा कणा मोडला; हजारो छोटे उद्योग थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 3:30 AM

लाखो हातांनी गमावला रोजगार, कोट्यवधींची उलाढाल ठप्प

मुंबई : धारावीसह मुंबईतल्या अनेक महाकाय झोपडपट्ट्यांमधूनच हजारो छोटे, मोठे व्यवसाय, उद्योगधंदे चालतात. लाखो हातांना रोजगार मिळतो. कोट्यवधींची उलाढाल होते. गेल्या दोन महिन्यांपासून हे सारे थंडावले आहे. बांधकाम व्यवसायाला एक लाख कोटींचा फटका बसला. रिटेल व्यवसायाचे ९ लाख कोटी बुडाले तर हवाई वाहतुकीला ५५ अब्जांचा तोटा सहन करावा लागला. कोरोनाच्या प्रकोपामुळे मोठमोठ्या उद्योगांच्या नुकसानीचे हे आकडे रोज समोर येत आहेत. परंतु, मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधील उद्ध्वस्त झालेल्या अर्थचक्राचे ना मोजमाप होतेय ना त्यांच्यासाठी कुठले पॅकेज आहे.

धारावी ही केवळ आशिया खंडातली सर्वांत मोठी झोपडपट्टी नसून जवळपास पाऊण लाख कुटुंबांचे पोट भरणारी स्वतंत्र अर्थव्यवस्था आहे.  चामड्याच्या बॅगपासून ते पापड-लोणच्यांपर्यंत आणि टाचण्यांपासून ते कपड्यांपर्यंतची असंख्य उद्योगांची भिस्त या परिसरावर आहे. शहरांतल्या हजारो टन कचऱ्यातून वेचलेल्या ‘मौल्यवान’ वस्तूंच्या रिसायकलिंगचा व्यवसाय हजारो कोटींवर झेपावणारा आहे. तुमच्या-आमच्या घरापर्यंत येणारे फरसाण, शेव, चकल्या बनविणाºया भट्ट्यांही इथेच धगधगत असतात.

उद्योगांसाठी असलेल्या कायद्यांचे कमीतकमी पालन आणि कमीतकमी गुंतवणूक आदी कारणांमुळे कमी खर्चात उत्पादने तयार होतात. त्यामुळेच मुंबईच्या अर्थकारणात झोपड्यांचाही मोठा वाटा आहे. मात्र, कोरोनामुळे ही अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे.  आमच्या कारखान्यात तयार होणाºया चामड्याच्या वस्तू आखाती देशांसह मलेशिया, दक्षिण अफ्रिकेतही निर्यात होतात.

आता कोरोनाच्या दहशतीमुळे बंद झालेली ही निर्यात पुन्हा सुरू होईल की नाही या भीतीने चर्मोद्योजकांना ग्रासले आहे. तर, मुंबईतली लोकल सुरू झाली तरी सुरक्षेच्या कारणास्तव कुणी आमच्या चकल्या, शेव, समोसे विकत घेतील का, असा प्रश्नही येथे राबणाºया महिलांना पडला आहे. कामगार पुन्हा येतील आणि त्याच पद्धतीने काम करतील का, असाही काही उद्योजकांचा सवाल आहे. कोरोनामुळे इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा पुरता मोडला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस