Join us  

ब्रिटिश कौन्सिलकडून मुलांसाठी ऑनलाईन साहित्याचा खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 7:47 PM

गोष्ट निर्मिती, वर्डबॅग सारख्या असंख्य गोष्टीतून ज्ञानात पडणार भर...

मुंबई : लॉकडाऊनच्या सध्याच्या काळात काय करावे ? काय वाचावे ? असा प्रश्न लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच पडला आहे. त्यावर प्रत्येकजण आपापल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असून याला आता ब्रिटिश कौन्सिलच्या नवीन ऑनलाईन साहित्याची आणि इंटरॅक्टिव्ह कोर्सेसची जोड मिळणार आहे. शाळांना असलेली सुट्टी, ऑफिसेसचे वर्क फ्रॉम होम आणि त्यामुळे घरात असतानाचा बराचसा मोकळा वेळ लक्षात घेऊन ब्रिटिश कौन्सिलने लहान मुले, विद्यार्थी, तरुण आणि मोठी माणसे या साऱ्यांच्या गरजा आणि आवडी निवडी  हिशोबाने अनेक ऑनलाईन पर्यायांची निर्मिती केली आहे. ज्यांचा वापर करून या साऱ्यांनाच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काहीतरी वेगळे करता ,वाचता आणि बदल घडविता  येणार आहेत. या लॉकडाऊन दरम्यान विशेषतः घरात अडकून पडलेल्या मुलांच्या मागे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या पालकांची दमछाक होत आहे. त्यासाठी ब्रिटीश कौन्सिलकडून ऑनलाईन लर्निंगचे विविध पर्याय दिले आहेत. लर्न इंग्लिश या उपक्रमातून मुळे आपल्या शाळेतील विविध पुस्तकांचे रिव्हिजन करू शकणार आहेत. चॅलेंज या फ्रेंड या उपक्रमातून आपल्या मित्राना व्हिडीओ कॉल किंवा चॅटिंगमधून इंग्लिशमधून संवाद साधण्याचे चॅलेंज देऊ शकणार आहेत. यामधून त्यांचा एकमेकांसोबत संवाद होऊन संवाद कौशल्य सुधारण्यास मदत होऊ शकेल. याचसोबत कोण उत्तम गोष्ट तयार करू शकते ? कोण पटापट म्हणी आणि टंग ट्विस्टर बोलू शकते असे गमतीशीर खेळ ही या उपक्रमांच्या माध्यमातून मुळे खेळू शकणार आहेत.विविध खेळासोबत क्राफ्ट्सचे विविध प्रकार ही ब्रिटीश कौन्सिलच्या या उपक्रमाद्वारे शिकता येणार आहेत. घरी बसून व्हिडीओ पाहून विविध आकाराचे , प्रकारचे प्राणी पक्षी यांचे ओरिगामी मुलांना सोप्या पद्धतीने शिकविणे पालकाना ही सोपे असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांची शब्दसंपदा वाढावी म्हणून देखील यामध्ये पर्याय उपलब्ध असून विविध शब्द तयार करण्याचे गेमही कौन्सिलकडून तयार करण्यात आले आहेत. विविध गाणी आणि गोष्टींच्या माध्यमातून ही शब्दसंपदा आणखी वाढण्यात मदत करता येणार आहे. वर्ड बॅगचा वापर करून मुलांना शब्दांचा अर्थ कळतो का ? शब्द लिहिता येतो का ? त्याचे भाषांतर येते का ?  करून एखादी छोटी गोष्ट किंवा गाणे तयार करता येते का हे पालकांना कळू शकते. ब्रिटिश कौन्सिल सगळा खजिना मुलांना आपल्या वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध करून दिला असून विद्यार्थी , पालक त्याचा वापर केव्हाही आणि कधीही करू शकणार आहेत.  या लॉकडाऊनच्या काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान न होता त्यांच्या ज्ञानात आणखी भर पडावी हा या ऑनलाईन साहित्य निर्मितीचा आणि कोर्सेसचा उद्देश आहे.

टॅग्स :शिक्षणकोरोना सकारात्मक बातम्या