मुंबई : ‘जिंगल बेल जिंंगल बेल जिंंगल आॅल द वे... सांताक्लॉज इज कमिंग अराउंड ड्रायव्हिंग आॅन स्ले...’ लहान मुलांना आवडणारा, भरपूर चॉकलेट्स, गिफ्ट्स देणारा सांताक्लॉज लवकरच येणार आहे. या सांताच्या स्वागतासाठी अनेक बाजारपेठा सजावटीच्या विविध वस्तूंनी सजल्या आहेत.नाताळ म्हटला की, रंगीबेरंगी सजावट आली. सध्या बाजारात अनेक ठिकाणी ख्रिसमस ट्री पाहायला मिळत आहेत. आॅफिस टेबलपासून ते मोठ्या आकाराच्या ख्रिसमस ट्री अशी विविधता आहे. यामध्येही सजवलेले रेडिमेड ट्री अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. यावर लावलेल्या सोनेरी, चंदेरी आणि लाल रंगाच्या बेल्स, तारका, स्नो फ्लेक्स, रिबीन आकर्षून घेणाऱ्या आहेत. याबरोबरच पारंपरिक पद्धतीचे ख्रिसमस ट्रीसुद्धा आहेत. सजावटीचे वेगवेगळे साहित्य घेऊनही हे ख्रिसमस ट्री सजवता येऊ शकतात. रेडिमेड सजवलेल्या ख्रिसमस ट्रीची किंमत अगदी ७० रुपयांपासून ते अगदी ५०० रुपयांपर्यंत आहे. तर साधा ख्रिसमस ट्री ५० ते ३५० रुपयांपर्यंत आहे.ख्रिसमस ट्रीनंतर तेवढीच महत्त्वाची असते ती रोषणाई. यासाठी नाताळ स्पेशल तोरणेसुद्धा बाजारात आहेत. बारीक लहान लहान रंगीबेरंगी तोरणांनी यंदा बाजार फुलले आहेत. विशेष म्हणजे विजेची बचत करणाऱ्या तोरणांची मागणी यात जास्त आहे. या तोरणांची किंमत १५० रुपयांपासून ते अगदी ५०० रुपयांपर्यंत आहे. याशिवाय कंदील, पायमोजे, नाताळची टोपी, फ्लॉवर रिंग्ज, आर्टिफिशल फुले यांमध्येही विविधता पाहायला आहे.हल्ली इतर सणांप्रमाणे ‘नाताळ’ हा सणसुद्धा शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. म्हणूनच अनेक ठिकाणी नाताळची खरेदी करताना विविध धर्मांतील लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)
सांताच्या स्वागतासाठी सजला बाजार
By admin | Updated: December 22, 2015 00:58 IST