सचिन लुंगसे
मुंबई : सायन रेल्वे मार्गावरील पूल पुनर्बांधणीसाठी बंद केल्यानंतर आता यंत्रणेने आपला मोर्चा एल्फिन्स्टन पुलाकडे वळविला आहे. मात्र, या पूल बंदीमुळे मुंबईकरांच्या तोंडाला फेस येणार आहे.
सायन पूल बंद असल्याने नागरिकांना धारावीतून वळसा घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग गाठवा लागत असून, यात ३० ते ४५ मिनिटे अधिक लागत आहे. त्यातच एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यानंतर वाहनांना दादरचा टिळक पूल, करी रोड आणि चिंचपोकळी येथील पुलांचे पर्याय उरणार आहेत. या वळशामुळे वाहतुकीसाठी ३० मिनिटे अधिकची खर्ची पडणार आहे. आधीच वाहतूककोंडीने नाकीनऊ आणली असताना आता पूल कोंडीने मुंबईचा चक्का जाम होणार आहे.
वाहनचालक, नागरिकांना लांबचा वळसा
लोअर परळ, ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांनी सांगितले की, एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यानंतर टिळक पूल आणि करी रोड पुलाचा पर्याय उरेल.
एल्फिन्स्टन पुलावरील वाहतुकीचा भार या दोन्ही पुलांवर पडेल. त्यामुळे दोन्ही टोकाला कोंडी वाढून प्रवास किचकट होईल. करी रोडच्या तुलनेत दादरला अधिक फटका बसेल.
वांद्रे-वरळी ते अटल सेतूशी कनेक्टिव्हिटी
वांद्रे-वरळी सागरी सेतू थेट अटल सेतूशी शिवडी येथे जोडण्यात येणार आहे. हा मार्ग एल्फिन्स्टन येथून जाणार असून, तेथे दुमजली पूल बांधण्यात येणार आहे.
‘यंत्रणांतील समन्वयाच्या अभावाचा फटका’
सायन पूल बंद होऊन आठ महिने झाले आहेत, तरीही जुन्या पुलाचे पाडकाम अद्याप प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. सरकारचे गैरनियोजन आणि यंत्रणांतील समन्वयाच्या अभावाचा फटका नागरिकांना बसत आहे.
सायन पूल आधीच बंद असताना, टिळक पूल व इतर काही मार्गांवरही रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यानंतर पूर्व-पश्चिम वाहतुकीवर गंभीर परिणाम होणार आहे.
प्रवाशांसाठी सुरक्षित पर्यायी मार्ग स्पष्टपणे दर्शवणारे फलक लावावेत तसेच मार्गदर्शनासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करावी. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेस व सुविधांना प्राधान्य द्यावे, याकडे खासदार वर्षा गायकवाड यांनी लक्ष वेधले.
परळच्या एसटी डेपोतून सगळ्या बस एल्फिन्स्टन पुलावरून दादरला येतात. या बसना आता करी रोडला वळसा घालून दादरला जावे लागते. टिळक पुलावरून जाणाऱ्या बसनाही दादर टीटी येथे यावे लागेल.
अनुप दुबे, रहिवासी