मुंबई : चेंबूरमधील भाजप नगरसेविका राजश्री पालांडे यांच्याविरोधात याच परिसरातल्या एका गॅरेजमालकाकडे एक गाळा व पाच लाखांची लाच मागितल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, पालांडेतर्फे गॅरेजमालकाकडून लाचेचा पहिला हफ्ता स्वीकारताना साथीदार सुनील गोविंदराम खन्ना याला एसीबीने शुक्रवारी रंगेहाथ अटक केली आहे.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार चेंबूरच्या शालीमार पेट्रोलपंपाजवळ तक्रारदाराचे गॅरेज आहे. हे गॅरेज काही दिवसांपूर्वी पालिकेने पाडले व मालकाला एमआरटीपी कायद्यानुसार नोटीस बजावली होती. ही नोटीस रद्द करण्यासाठी पालांडे व खन्ना यांनी गॅरेजच्या जागेमधून एक गाळा व पाच लाख द्यावे लागतील, असे सांगितले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने मालकाने एसीबीकडे तक्रार दिली.प्राथमिक तपासात पालांडे, खन्ना यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मालक व पालांडे-खन्ना यांच्यात चर्चा लाचेच्या रक्कमेवरून तडजोड सुरू होती. अखेर दोघांनी एक लाखांवर तडजोड केली. त्यापैकी ५० हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारताना खन्ना याला एसीबीने चेंबूरच्या सी. जी. रोडवरून रंगेहाथ अटक केली. चौकशीत खन्ना याने पालांडे यांचे नाव घेतले. या प्रकरणात पालांडे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. एसीबीने रात्री उशिरा या दोघांच्या निवासस्थानी छापा घातल्याची माहिती मिळते. (प्रतिनिधी)
लाचखोर भाजपा नगरसेविकेवर गुन्हा दाखल
By admin | Updated: February 21, 2015 03:20 IST