मुंबई : नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’च्या शाखेत प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने पाच जणांच्या टोळीने तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नूरजहाँ शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाच जणांविरुद्ध अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नूरजहाँ यांच्या मुलाला डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये प्रवेश हवा होता. मात्र मुलाला मार्क कमी पडल्याने त्याला महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. त्यासाठी ते प्रयत्न करीत असताना त्यांची ओळख या टोळीशी झाली. प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने प्रत्येकाने त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम घेतली. एकूण १ कोटी ३५ लाख रुपये त्यांच्याकडून उकळले. मात्र त्यानंतरही मुलाला प्रवेश न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे नूरजहाँ यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी याबाबत अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
एमबीबीएसला प्रवेश देण्याच्या आमिषाने १ कोटीचा गंडा, पाच जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 02:04 IST