Join us  

महाविकास आघाडीत बिघाडी; स्थायीत पडली वादाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 5:43 AM

राज्यात सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीबरोबर सूत जमवले,

मुंबई : राज्यात सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीबरोबर सूत जमवले, परंतु महापालिकेमध्ये या महाविकास आघाडीत वादाची पहिली ठिणगी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत पडली. कनिष्ठ अभियंत्यांच्या भरती प्रकरणावर बोलण्याची संधी दिली नाही, असा आरोप करीत आघाडीच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला. शिवसेनेने आमच्यावर कोणती मेहेरबानी केलेली नाही. प्रत्येक पक्षाचा मान-सन्मान असतो, तो सन्मान ठेवला नाही, तर असे वाद सुरूच राहातील, असा गर्भित इशारा काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादीच्या गटनेत्यांनी शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडाची चिन्हे आहेत.कनिष्ठ अभियंत्यांची रिक्त पदे भरण्यासाठी नियोजित परीक्षेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची सूचना काँग्रेस-राष्ट्रवादीने केली होती, परंतु प्रशासनाने आपल्या भूमिकेवर ठाम राहत ही परीक्षा त्याच तारखेला घेतली. आता परीक्षा झाल्यामुळे त्याप्रमाणे भरतीही करण्यात यावी, अशी भूमिका प्रशासनाने मांडली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी प्रशासनाने आणला होता. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी-समाजवादीच्या सदस्यांनी काही बोलण्याआधीच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामुळे नाराज झालेल्या या सदस्यांनी सभात्याग केला. या विषयावर स्थायी समिती आणि पालिका महासभेची बैठक तहकूब करण्यात आल्यानंतर, शिवसेनेने आता या विषयावर कोलांटी उडी घेतली असल्याचा संताप काँग्रेसने व्यक्त केला आहे.महापालिकेत रिक्त ३४१ अभियंत्यांची पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्याचे काम प्रशासनाने खासगी संस्थेला दिले होते. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या परीक्षा घेण्यापासून निकालापर्यंत सर्व जबाबदाºया संबंधित संस्थेवर होत्या. यासाठी या कंपनीला एक कोटी ५१ लाख रुपये कामाचा मोबदला देण्यात आला आहे. ही परीक्षा घेण्याची प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात घेण्यात आली होती. त्यामुळे जास्तीतजास्त उमेदवारांना या परीक्षेला बसता यावे, याकरिता ही प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. त्यावेळेस शिवसेनेनेही समर्थन करीत सभा तहकूब केली होती. मात्र, परीक्षा घेण्यात आल्याने, त्यानुसार भरती प्रक्रिया पूर्ण करण्यावर प्रशासन ठाम आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये बुधवारी मंजुरी देण्यात आली.>आघाडीच्या सदस्यांचीशिवसेना करणार मनधरणीभाजपबरोबर फारकत घेतल्यानंतर शिवसेनेचा आघाडीबरोबर नवीन संसार राज्यात सुरू झाला आहे. त्यात फूट पडू नये, याची खबरदारी ज्येष्ठ नेते घेत आहेत. त्यामुळे स्थायी समितीतील या वादाचे पडसाद मातोश्रीवरही उमटल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीच्या गटनेत्यांनी मनधरणी शिवसेना करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.>स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपली अरेरावी बंद करावी. आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडणारच. त्यांनी आम्हाला गृहीत धरू नये.- राखी जाधव (गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस).>जास्तीतजास्त बेरोजगार अभियंत्यांना महापालिकेत नोकरीची संधी मिळावी, यासाठी या प्रस्तावावर चर्चा होणे आवश्यक होते. महाविकास आघाडी म्हणजे असे नाही की तुम्ही काही कराल आणि आम्ही बोलणार नाही? आमचा अधिकार आम्ही वापरणार.- रईस शेख (आमदार, गटनेता, समाजवादी पक्ष).>स्थायी समितीमध्ये प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली जाते. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचे नुकसान होऊ नये, यासाठी भरती प्रक्रियेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. विरोधी पक्षातील सदस्यांना नेहमीच बोलण्याची संधी दिली जाते. त्यांचा काही गैरसमज झाला असेल, तर तो लवकरच दूर करण्यात येईल.- यशवंत जाधव (स्थायी समिती अध्यक्ष)>सर्व पक्षांना त्यांचा मान-सन्मान मिळायलाच हवा. आमचे मत मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. आघाडीत असलो, म्हणून काहीही खपवून घेणार नाही. स्थायी समिती अध्यक्षांना मनमानी पद्धतीने कारभार चालवायचा असेल, तर असा विरोध यापुढेही होत राहणार.- रवी राजा (विरोधी पक्षनेते, महापालिका).

टॅग्स :मुंबई महानगरपालिका