Join us

९ हजार रुपयांचा नाश्ता पडला सव्वा लाखाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 06:38 IST

अंधेरीतील महिलेची फसवणूक; परताव्याच्या नावाखाली बँक खात्यातून ठगाने काढले पैसे

मुंबई : सिंगापूरमध्ये नाश्त्यासाठी मोजलेले नऊ हजार रुपये परत मिळविण्याच्या नादात एका गृहिणीला सव्वा लाख रुपये गमवावे लागले आहेत. या प्रकरणी पवई पोसील स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ३९ वर्षीय गृहिणी या अंधेरी परिसरात राहणाऱ्या आहेत. त्यांचे पती बँकेत कामाला आहेत. मार्च २०१९ मध्ये मेक माय ट्रिप या वेबसाईटवरून त्यांनी सिंगापूर येथे सहलीला जाण्यासाठी बुकिंग केले होते. त्यात नाश्ता मोफत देण्यात येणार होता. मात्र तेथे गेल्यानंतर हॉटेलमध्ये नाश्तामध्ये फक्त ब्रेड, बटर आणि चहा मिळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत मेक माय ट्रिपच्या कमलदीप त्रिपाठी यांच्यासोबत चर्चा केली. तडजोडीअंती ९ हजारांचा परतावा देण्याचे ठरले. सहलीवरून मुंबईत परत आल्यानंतर त्यांनी त्रिपाठी यांच्याकडे पैशांबाबत विचारणा केली. १० एप्रिल ते २३ जुलैपर्यंत याबाबत त्या पाठपुरावा करीत होत्या. मात्र त्यांच्याकड़ून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर बुधवारी दुपारी त्यांनी मेक माय ट्रिप हेल्पलाइनवर कॉल केला. सुरुवातीला रिंग वाजून तो फोन कट झाला. त्यानंतर त्याच क्रमांकावरून त्यांना कॉल आला. महिलेने संबंधित कॉलधारकाकडे परताव्याचे पैसे कधी मिळणार याबाबत विचारणा केली. त्याने पैसे परत करण्यासाठी गुगल पे किंवा फोन पे अकाउंटची माहिती देण्यास सांगितले. परंतु त्यांच्याकडे दोन्हीही नसल्याचे त्यांनी बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या लिंकवर माहिती भरून देण्यास सांगितले. त्यांनी माहिती पाठवून देताच त्यांच्या खात्यातून १ लाख ३४ हजार रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर आला. त्यांनी पुन्हा हेल्पलाइनवर कॉल करण्याचा प्रयत्न केला; पण कुणीही फोन उचलला नाही. अखेर त्यांनी पवई पोलिसांत तक्रार दिली.

पोलीस तपास सुरूपवई पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून चौकशी सुरू केली आहे. संबंधित हेल्पलाइन क्रमांक तसेच मेक माय ट्रिपच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडे पोलीस अधिक तपास करणार आहेत.