Join us
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीवर बहिष्कार टाका, मग उद्धव ठाकरेच काय, मोदीही तुमच्याकडे येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:06 IST

प्रल्हाद मोदी : उल्हासनगरात व्यापाऱ्यांना केले मार्गदर्शनलोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे विस्थापित होत असलेल्या व्यापाऱ्यांनी ...

प्रल्हाद मोदी : उल्हासनगरात व्यापाऱ्यांना केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे विस्थापित होत असलेल्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत जीएसटीवर सामूहिक बहिष्कार टाकावा, मग उद्धव ठाकरेच काय, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ आणि ऑल इंडिया फेअर प्राइज शॉपचे अध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी व्यक्त केले.

व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने गाेलमैदान येथील सोमय्या हॉलमध्ये शुक्रवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. व्यापाऱ्यांनी जीएसटीवर सामूहिक बहिष्कार टाकल्यास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा तुमच्याकडे येतील, असे वक्तव्य प्रल्हाद मोदी यांनी करून व्यापाऱ्यांची संघटनात्मक ताकद मोठी असल्याचे सांगितले. यूटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, नगरसेवक मनोज लासी, दीपक छतवानी, आकाश चक्रवर्ती, दीपक राजवानी आदींनी व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांचा पाढा यावेळी वाचला. शासनाने व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची माहिती चक्रवर्ती यांनी दिली. प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या देशपातळीवर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

------------

त्यांना चहावाला नाही, चहावाल्याचा मुलगा म्हणा...

‘आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा सहा भावंडांचे पालनपोषण केले. त्यावेळी ज्याचा नंबर असेल तसे आम्हीही चहा विकला; पण चहावाले आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा त्यांना चहावाल्याचा मुलगा म्हणा. आम्ही चहावाल्याची मुले आहोत’, असेही प्रल्हाद मोदी यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------