Join us  

स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या आईविरोधात मुलगा उच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 2:21 AM

१९८६मध्ये आरतीच्या आईने श्रीकांतचा कायदेशीर ताबा मिळविला. सुरुवातीला त्यांचा सांभाळ आजीने केला. त्यानंतर मावशीने त्यांचा सांभाळ केला.

मुंबई : मुलगा म्हणून स्वीकार करण्यास नकार देणाºया आईविरोधात ४० वर्षीय मुलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आईच्या या वर्तणुकीमुळे आपल्याला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला आणि त्या मानसिक त्रासापोटी आपल्याला दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी विनंती मेकअप आर्टिस्ट श्रीकांत सबनीस यांनी उच्च न्यायालयाला केली आहे. त्यावर न्यायालयाने आईला सहा आठवड्यांत या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.

श्रीकांत दोन वर्षांचे असताना त्यांची आई त्यांना डेक्कन एक्स्प्रेसमध्ये सोडून गेली. एका अनोळखी शहरात अगदी लहान वयात आपल्याला सोडण्यात आले. आईने असे सोडून दिल्याबद्दल आयुष्यभर मानसिक त्रास भोगावा लागला. त्या त्रासाची आई व आपल्या सावत्र वडिलांना नुकसानभरपाई करावी लागेल, असे सबनीस यांनी याचिकेत म्हटले आहे.

श्रीकांत यांनी केलेल्या याचिकेनुसार, आरती म्हसकर यांनी दीपक सबनीस यांच्याशी विवाह केला. फेब्रुवारी १९७९मध्ये त्यांना मुलगा झाला. हा मुलगा म्हणजेच श्रीकांत सबनीस. सबनीस यांचे घर पुण्याला होते. श्रीकांत यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची आई आरती अत्यंत महत्त्वाकांक्षी होती. मुंबईत येऊन तिला सिनेसृष्टीत काम करायचे होते. सप्टेंबर १९८१मध्ये तिने श्रीकांत यांना घेऊन मुंबई गाठली. मुंबईला उतरल्यावर तिने श्रीकांत यांना पुन्हा त्याच ट्रेनमध्ये सोडले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि बालगृहात ठेवले.

१९८६मध्ये आरतीच्या आईने श्रीकांतचा कायदेशीर ताबा मिळविला. सुरुवातीला त्यांचा सांभाळ आजीने केला. त्यानंतर मावशीने त्यांचा सांभाळ केला. २०१७मध्ये त्यांना त्यांच्या आईचा ठावठिकाणा लागला. सप्टेंबर २०१८मध्ये श्रीकांत त्यांच्या आईला भेटले. श्रीकांत आपलाच मुलगा असल्याचे तिने मान्य केले. मात्र, काही टाळू न शकणाºया परिस्थितीमुळे श्रीकांतला सोडल्याचे त्याच्या आईने सांगितले. त्यानंतर श्रीकांत त्याच्या आईला व सावत्र वडिलांना भेटला. त्यावेळी त्यांनी श्रीकांतला त्याची खरी ओळख त्यांच्या अन्य मुलांपासून लपविण्यास सांगितले. ‘जगण्यासाठी नातेवाइकांकडे निवारा मिळविण्यास व सुधारगृहात नकली पालकांपासून आपला जीव वाचविता वाचविता आपण मानसिकरीत्या उद्ध्वस्त झालो. त्यामुळे आईने घातलेली अट अस्वीकाहार्य आहे,’ असे श्रीकांत यांनी याचिकेत म्हटले.

टॅग्स :उच्च न्यायालय