Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाऊन्सरने केली आगळीक

By admin | Updated: October 21, 2015 03:25 IST

डॉक्टर, परिचारिकांच्या सुरक्षेसाठी खासगी कंपनीचे बाऊन्सर महापालिकेच्या रुग्णालयात तैनात करण्यात आले आहेत. मात्र, महापालिकेच्या सायन रुग्णालयात कुंपणच शेत

मुंबई: डॉक्टर, परिचारिकांच्या सुरक्षेसाठी खासगी कंपनीचे बाऊन्सर महापालिकेच्या रुग्णालयात तैनात करण्यात आले आहेत. मात्र, महापालिकेच्या सायन रुग्णालयात कुंपणच शेत खात असल्याचा प्रत्यय येत आहे. रुग्णालयातील एका बाऊन्सरवर शिकाऊ परिचारिकेची छेड काढल्याचा आरोप सोमवारी सकाळी झाला. आता या बाऊन्सरविरुद्ध सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सायन रुग्णालयात सकाळी नऊच्या सुमारास एका बाऊन्सरने शिकाऊ परिचारिकेची छेड काढली. तेव्हा एका कर्मचाऱ्याने हस्तक्षेप केला असता, त्यालाही बाऊन्सरने मारहाण केली. गेल्या काही दिवसांपासून हा बाऊन्सर शिकाऊ परिचारिकांना त्रास देत आहे. शिकाऊ परिचारिकांची ओळख काढणे. त्यानंतर त्या रुग्णालय परिसरात दिसल्यास त्यांच्या नावाने हाका मारणे. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे, असे प्रकार हा बाऊन्सर करत होता. पण, मंगळवारी सकाळी एका शिकाऊ परिचारिकेची छेड काढल्यानंतर संतप्त झालेल्या परिचारिका एकत्र आल्या. सर्वांनी मिळून पोलीस ठाणे गाठले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. काही वेळा नातेवाईक संतप्त होऊन डॉक्टरांवर हल्ले करतात. हे प्रकार वाढत असल्यामुळे शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. डॉक्टरांना होणारे मारहाणीचे प्रकार, रुग्णालयाची तोडफोड असे प्रकार रोखण्यासाठी रुग्णालयात खासगी कंपनीचे बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत. पण, या बाऊन्सरमुळे सुरक्षित वाटण्यापेक्षा डॉक्टरच अधिक असुरक्षितच झाल्याचे एका परिचारिकेने सांगितले. या बाऊन्सरविरुद्ध सायन पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती सायन पोलिसांनी दिली. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल. चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. नक्की काय घडले?सायन रुग्णालयात सकाळी नऊच्या सुमारास एका बाऊन्सरने शिकाऊ परिचारिकेची छेड काढली. एका कर्मचाऱ्याने हस्तक्षेप केला असता त्यालाही मारहाण केली. गेल्या काही दिवसांपासून हा बाऊन्सर शिकाऊ परिचारिकांना त्रास देत आहे.