Join us

वाघाची कातडी विकणारे दोघे अटकेत

By admin | Updated: June 27, 2015 22:39 IST

पट्टेरी वाघाची कातडी विकण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी रात्री पेण-वडखळ येथे अटक केली.

अलिबाग : पट्टेरी वाघाची कातडी विकण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी रात्री पेण-वडखळ येथे अटक केली. आरोपींकडून सुमारे एक लाख २६ हजार १०० रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात वन्य प्राण्यांच्या अवयवांना मोठी मागणी असून यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.पेण-वडखळ येथे पट्टेरी वाघाची कातडी विकण्यासाठी दोन व्यक्ती येत असल्याची माहिती रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. येथील साईदरबार हॉटेलसमोर पोलिसांनी डमी खरेदीदार तयार केले. वाघाची कातडी विकण्यासाठी आलेल्या दोन व्यक्ती मोटारसायकलवरून आल्या. त्यांनी व्यवहाराची बोलणी सुरू केली. तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना घेरले. त्यांना ताब्यात घेऊन विक्री करण्यासाठी आणलेली वाघाची कातडीही ताब्यात घेतली. पोलिसांच्या पथकात असलेल्या क्षेत्रीय वन अधिकारी सुवर्णा खंडागळे आणि पशुधन विकास अधिकारी डॉ. संदीप भोसले यांनी कातड्याची प्राथमिक तपासणी केली आणि ती पट्टेरी वाघाची कातडी असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला.