मुंबई: गोरेगावमध्ये ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर जागे झालेल्या पालिका प्रशासनाने अखेर झाडांची छाटणी केली आहे. त्यामुळे अंगावर पडणारे किडे आणि झाडांमुळे होणारा अंधार कायमचा दूर झाल्याने गोरेगावकरांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.सुंदरनगरमध्ये गाडीवर झाड पडून पराग पावसकर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या प्रकारानंतर पालिकेने अडीचशे झाडांची छाटणी केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने छापले. ही झाडांची छाटणी बाहेरच्या रस्त्यावर केली गेली. मात्र सोसायट्यांर्गत पोकळ झालेल्या झाडांवर अद्याप कोणीच लक्ष दिलेले नाही. या झाडांवरून लोकांच्या अंगावर किडे पडतात. वाढलेल्या झाडांमुळे पथदिव्यांचा प्रकाश अडतो. आम्ही एखादी फांदी छाटली तर आमच्या विरोधात पालिकेत तक्रार होऊन पोलीस कारवाई होते. आम्ही याबाबत अनेकदा पालिकेत तक्रार केली. मात्र याकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यानंतर ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमातही या विषयावर आवाज उठवण्यात आला. हे वृत्त प्रसिद्ध होताच अवघ्या काही दिवसांत मोतीलालनगरमध्ये असलेल्या अवाढव्य झाडांची छाटणी पालिकेच्या पी दक्षिण विभागाकडून करण्यात आल्याचे येथील स्थानीक संध्या सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
किडे आणि अंधार दोन्ही झाले दूर
By admin | Updated: October 12, 2016 05:12 IST