मुंबई : शहरातील अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएआरसी अर्थात भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरच्या परिसरात ड्रोनच्या माध्यमातून रेकी करण्यात आल्याची माहिती सोमवारी समोर आली. चौकशीत मात्र ही रेकी नसून एका खासगी विकासकाने सर्व्हेसाठी फोटो काढल्याची माहिती पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी दिली. सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास (एम.एच.०२, सीआर१२१५) या टोयोटा कारमधून तीन जण देवनार डेपोसमोरील टाटा इन्स्टिट्यूट येथे आले. यातील दोघांनी ड्रोन आकाशाच्या दिशेने उडवला. त्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून त्यांनी अनेक फोटो काढले. त्याच वेळी ही बाब इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे व्यंकटेश नागेश करी या प्राध्यापकाच्या लक्षात आली. त्याने दोघांचे चित्रण त्यांच्या मोबाइलमध्ये केल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला तातडीने फोन करून या घटनेची माहिती दिली.ड्रोनच्या माध्यमातून बीआरसी परिसराची रेकी झाल्याची माहिती काही वेळातच सर्वच सुरक्षा यंत्रणांपर्यंत पोहोचली. कदाचित ही रेकी काही अतिरेकी संघटनांकडून असू शकते, असा संशय काही अधिकाऱ्यांना आला. ट्रॉम्बे पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून या व्यक्तींचा शोध सुरू केला. त्यानुसार या ठिकाणी फोटो शूटिंग करणारे नवी मुंबईतील हाउसिंग डॉट कॉम या रियल इस्टेट कंपनीचे कर्मचारी असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क केला असता, रात्री १० वाजण्याच्या सुमारास हे कर्मचारी ड्रोनसह ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी ड्रोनमधून फोटो काढून ते साईटवर अपलोड केल्याचे सांगितले.
बीएआरसी परिसरात ड्रोन उडवणारे दोघे ताब्यात
By admin | Updated: July 8, 2015 00:39 IST