Join us

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दोघांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:11 IST

नायर रुग्णालयातील घटनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नायर रुग्णालयात दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची ...

नायर रुग्णालयातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नायर रुग्णालयात दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली. यात ४६ वर्षीय डॉक्टरचा समावेश असून, त्यांना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नवव्या दिवशी कोरोना झाला, तर एका ५० वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्यालाही लसीचा डोस घेतल्यानंतर चौथ्या दिवशी कोरोनाचा संसर्ग झाला.

नायर रुग्णालयात डॉक्टरने ३० जानेवारी रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर त्यांंना अंगदुखी, सौम्य ताप, सर्दीचा त्रास होऊ लागला. ९ फेब्रुवारीला त्यांची अँटीजन चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरने आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवालही पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराअंती प्रकृती बरी असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले.

तर, लसीकरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एका ५० वर्षीय आराेग्य कर्मचाऱ्याने नायरमध्ये डोस घेतला होता. त्यानंतर चार दिवसांनी त्यांना ताप आला. ताप वाढल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाय रेमडेसिवीर इंजेक्शनही देण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

* भीती, गैरसमज पसरवू नये!

वाडिया रुग्णालयाचे लसीकरणतज्ज्ञ डॉ. मुकेश देसाई यांनी सांगितले की, पहिला डोस घेतल्यानंतर सामोरे जावे लागणाऱ्या दुष्परिणामांमुळे लस परिणामकारक नाही, असे म्हणता येणार नाही. लसीचा डोस घेतल्यानंतर दहा ते पंधरा दिवस रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होण्यास लागतात, त्यामुळे या प्रक्रियेला वेळ द्यावा लागतो. याविषयी भीती आणि गैरसमज पसरणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.

-----------------