Join us

बुट आणि मोबाईलचे कुरियर पडले २ लाखांना! ताज हॉटेलच्या कुकची कुरार पोलिसात तक्रार

By गौरी टेंबकर | Updated: February 8, 2023 12:04 IST

अमेरिकेत राहणाऱ्या लेकीने पाठवलेल्या मोबाईल आणि बुटाचे कुरियर ताज हॉटेलच्या कुकला चांगलेच महागात पडले. त्यांना यात २ लाखांचा गंडा घालण्यात आला असून याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई: अमेरिकेत राहणाऱ्या लेकीने पाठवलेल्या मोबाईल आणि बुटाचे कुरियर ताज हॉटेलच्या कुकला चांगलेच महागात पडले. त्यांना यात २ लाखांचा गंडा घालण्यात आला असून याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालाडच्या पठाणवाडी परिसरात असलेल्या अलकुबा अपार्टमेंटमध्ये तक्रारदार मुश्ताक शेख (५९) त्यांची पत्नी शबाना (५६) यांच्या सोबत राहतात. ताज हॉटेलमध्ये काम करणाऱ्या शेख यांचे एचडीएफसी बँकेत खाते आहे. ज्याचा वापर ते गुगल पे ॲप मार्फत ऑनलाईन व्यवहारांसाठी करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांची अमेरिकेत राहणारी लेक फरिन पटेल हिने त्यांचे गुजरातमधील नातेवाईक नजीर पटेल यांच्या कडून शेख यांच्यासाठी मोबाईल व मोबाईल फोन पाठवला होता.

जो नजीर यांनी तिरुपती कुरियर मार्फत गुजरातच्या भरूच येथून शेख यांच्या राहत्या पत्त्यावर धाळल्याचे सांगितले. मात्र ते पार्सल मिळाले नाही. त्यामुळे शेख यांनी २ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास इंटरनेट वरुन तिरुपती कुरियरच्या कस्टमर केअरचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना ७९८०९०८७६२ हा नंबर मिळाला आणि त्यांनी त्यावर संपर्क करत नजीर यांनी पाठवलेल्या पार्सलबाबत विचारणा केली. तेव्हा फोन उचलणाऱ्याने त्यांना डिलिव्हरी बॉयचा नंबर पाठवतो असे सांगत त्यांना फोन पे वर ५ रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र त्यांच्याकडे गुगल पे असल्याचे शेख यांनी सांगितल्यावर फोन वरील इसमाने त्यांना ते डाऊनलोड करण्यास लावले. तेव्हा त्यावरूनही फोन पे होत नसल्याने शेख यांना बोलण्यात गुंतवून त्याने नेटबँकिग आयडी व पासवर्ड घेत नंतर डिलिव्हरी बॉयचा नंबर पाठवतो असे शेख याना सांगितले.

मात्र ३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास शेख यांच्या खात्यातून १ लाख ९९ हजार काढण्यात आल्याचा मेसेज त्यांना आला. तेव्हा फसवणुक झाल्याचे शेख यांच्या लक्षात आले आणि त्यांनी नेट बँकिंग खाते बंद करून कुरार पोलिसात धाव घेतली.

टॅग्स :मुंबई